महाराष्ट्ररत्नागिरी अपडेट्सलोकल न्यूजसाहित्य-कला-संस्कृती

जगभरात पंधरा टक्के असलेल्या हिंदूंनी संघटित होण्याची गरज : चारुदत्तबुवा आफळे

रत्नागिरी : जगभरातील ६० देश मुस्लिमबहुल, तर १०० हून अधिक देश ख्रिश्चनांचे आहेत. त्यांच्यासह अन्य धर्मीयांच्या तुलनेत जगभरात हिंदूंची संख्या केवळ पंधरा टक्के आहे. त्यामध्ये भारतात सर्वाधिक हिंदू आहेत. त्या साऱ्यांनी आपल्या आणि आपल्या धर्माच्या अस्तित्वासाठी संघटित होणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन राष्ट्रीय कीर्तनकार चारुदत्तबुवा आफळे यांनी येथे केले.

येथील स्वर्गीय प्रमोद महाजन क्रीडा संकुलात सुरू असलेल्या पंधराव्या कीर्तनसंध्या महोत्सवात चौथ्या दिवशीचे पुष्प गुंफताना ते बोलत होते. ते म्हणाले की, हिंदू धर्म विविध पंथांमध्ये विखुरला आहे. मात्र तरीही विविधतेतून एकता हे तत्त्व जपतानाच भारताने आपले वेगळेपण टिकविले आहे. असे असले, तरी विविध प्रलोभने दाखवून तसेच धाकदपटशाने धर्मांतर मोठ्या प्रमाणावर होत आहे. हे असेच सुरू राहिले तर हिंदू धर्माचे आणि हिंदूधर्मीयांचे भवितव्य बिकट आहे. विविध पंथ आणि वेगवेगळ्या परंपरा जोपासतानाच भारताने एकता अबाधित राखली असली, तरी एकाच धर्मात अनेक गुरू आणि विविध पंथ असल्यामुळे प्रत्येक जण आपापला गुरू आणि पंथ एवढ्यालाच मानतो. हिंदू धर्मातील एखाद्या पंथाचे किंवा एखाद्या गुरूचे तत्वज्ञान पटत नसले तरी तो हिंदू आहे, हे लक्षात घेऊन मतभेद विसरून राष्ट्र म्हणून सर्व पंथीयांनी एकत्र यायला हवे. एकमेकांचे सणसमारंभ साजरे केले पाहिजेत. एकमेकांच्या गुरूंचा आदर राखला पाहिजे. तसे झाले तरच समाज संघटित होईल. उच्च विचार, थोर परंपरा, आदरभाव, माणुसकीची शिकवण देणारा हिंदू धर्म टिकविण्याची जबाबदारी आपली आणि आपल्या पुढच्याही पिढ्यांची आहे, हे लक्षात ठेवून वाटचाल करायला हवी, असेही बुवा म्हणाले.

व्यक्तिगत जीवनातही प्रत्येकाने उपासना आणि साधनेला महत्त्व दिले पाहिजे, असे सांगून ते म्हणाले की भारतीय तत्त्वज्ञानात अनेक जन्म कल्पिले गेले आहेत. एखाद्या जन्मातील उत्तम वागणूक पुढच्या जन्मात उपयुक्त ठरू शकते. त्याच पद्धतीने एखाद्या जन्मातील साधना आणि कष्ट पुढच्या जन्मात उपयोगाचे ठरू शकतात. याची अनेक उदाहरणे रामायण-महाभारत आणि पुराणात सापडतात. याच जन्मात कष्टांचे चीज झाले, तर त्याला यश म्हणता येईल. मात्र अपयश आले, तरी यशाच्या दृष्टीने केलेले प्रयत्न म्हणजेसुद्धा यशस म्हणता येईल. कोणत्याही साधनेला वयाचे बंधन नसते. शुभ संकल्प केव्हाही करता येऊ शकतो. त्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. महाभारतातील अर्जुनाचा पुत्र अभिमन्यू याचा चक्रव्यूह भेदण्याची कला ज्ञात नसल्यामुळे झालेला मृत्यू हे एक प्रकारचे यश म्हटले पाहिजे. कारण त्याच्या मृत्यूमुळे अभिमन्यूला मारण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या जयद्रथाचा विनाश करणे अर्जुनाला शक्य झाले. स्वतः जिवंत राहण्यात अभिमन्यू यशस्वी ठरला नसला तरी एक प्रकारे त्याने आपल्या मृत्यूमुळे पांडवांच्या यशाचा मार्ग खुला करून दिला.

रत्नागिरीतील मारुती मंदिर शिवरायांच्या पुतळ्याची दररोज वेगवेगळ्या लोकांकडून होणारी पूजा हा इतरांसाठी मोठाच आदर्श आणि अभिमानास्पद उपक्रम आहे, असे बुवांनी आवर्जून सांगितले.

मध्यांतरात आदित्य लिमये याने विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म हा तुकाराम महाराजांचा अभंग सादर केला. येत्या २२ जानेवारी रोजी श्रीश्री रविशंकर यांचा कार्यक्रम रत्नागिरीत गोगटे-जोगळेकर महाविद्यालयाच्या मैदानावर होणार आहे. आध्यात्मिक आणि योगसाधनेचे गुरू असलेल्या रविशंकर यांच्या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले. रत्नागिरीच्या संस्कृत वेद पाठशाळेत ऋग्वेदाचे ५५ दिवसांचे पारायण सुरू आहे. त्यालाही भेट देण्याचे आवाहन आयोजकांनी केले.

Team RatnagiriLive

कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button