रत्नागिरीतील फाटक हायस्कूलच्या जान्हवी, अस्मी, तीर्थासह अन्विक्षा झळकल्या राज्य गुणवत्ता यादीत!

- शासकीय एलिमेंट्री व इंटरमिजिएट परीक्षा
रत्नागिरी : राज्य कला संचालनालयामार्फत घेण्यात आलेल्या एलिमेंट्री व इंटरमिजिएट या परीक्षांमध्ये फाटक हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी यश संपादन करत उज्ज्वल निकालाची परंपरा कायम राखली आहे. या दोन्ही परीक्षांचा निकाल शंभर टक्के लागला असून विद्यालयातील चार विद्यार्थी राज्य गुणवत्ता यादीमध्ये चमकले असून एकूण सहा पारितोषिकांची लयलूट केली आहे.

परीक्षेला बसलेल्या ६९ विद्यार्थ्यांपैकी तब्बल ६२ विद्यार्थ्यांनी ए श्रेणी प्राप्त केली आहे.
इंटरमिजिएट परीक्षेला एकूण ३४ विद्यार्थी बसले होते. ते सर्व उत्तीर्ण झाले असून निकाल शंभर टक्के लागला आहे. यातील ३१ विद्यार्थ्यांना ए श्रेणी दोन विद्यार्थ्यांना बी श्रेणी तर एका विद्यार्थ्याला सी श्रेणी मिळाली आहे. या परीक्षेत जान्हवी भुवड ही राज्य गुणवत्ता यादीत ७ वी आली असून तिला भूमिती आणि अक्षरलेखन विषयात पारितोषिक प्राप्त झाले आहे. अस्मी कानसे राज्यात ७१ वी आणि तीर्था सागवेकर राज्यात ८२ वी अशा तीन विद्यार्थिनींनी राज्य गुणवत्ता यादीमध्ये स्थान प्राप्त केले आहे.

एलिमेंटरी ड्रॉईंग परीक्षा दिलेले ३५ पैकी सर्व विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून निकाल शंभर टक्के लागला आहे. यामध्ये ३१ विद्यार्थ्यांना ए श्रेणी व चार विद्यार्थ्यांना बी श्रेणी प्राप्त केली असून अन्विक्षा भेलेकर या विद्यार्थिनीने राज्य गुणवत्ता यादीमध्ये ५३ व ऑब्जेक्ट ड्रॉईंग विषयामध्ये पारितोषिक प्राप्त झाले आहे.
या विद्यार्थ्यांना शाळेतील कलाशिक्षक दिलीप भातडे व नीलेश पावसकर यांनी मार्गदर्शन केले. यशस्वी विद्यार्थ्यांचे शाळेचे मुख्याध्यापक राजन कीर, उपमुख्याध्यापक विश्वेश जोशी, पर्यवेक्षिका नेहा शेट्ये व संस्थेचे पदाधिकारी यांच्या वतीने अभिनंदन करण्यात आले.





