JSW : जयगडमधील जेएसडब्ल्यू कॉलनीत कामगाराची आत्महत्या

रत्नागिरी : तालुक्यातील जयगड येथील जेएसडब्ल्यू (JSW) कंपनीच्या लेबर कॉलनीमध्ये तेथील एका कामगाराने गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेचे कारण मात्र समजू शकले नाही. ही घटना शुक्रवारी ( १६ जानेवारी) रोजी सकाळी 10.20 वा. सुमारास उघडकीस आली.
जबन तालो मांझी (42, मूळ रा. झारखंड ) असे गळफास घेऊन जीवनयात्रा संपवलेल्या कामगाराचे नाव आहे. याबाबत त्याचा सहकारी नंदकु बीको मांझी याने जयगड पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार, शुक्रवारी सकाळी नंदकु मांझी हा जबन मांझीच्या रूममधे गेला असता त्याला रूमच्या लोखंडी बारला जबन रस्सीने गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसून आला. त्याने इतर कामगारांना याची माहिती दिल्यानंतर त्यांनी जयगड पोलिसांना याबाबत माहिती दिली.
या घटनेची माहिती मिळताच जयगड पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत मृतदेहाचा पंचनामा करून उत्तरीय तपासणीसाठी रुग्णालयात पाठवला. सायंकाळी उशिरापर्यंत याबाबत जयगड पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्याची कार्यवाही सुरु होती.





