रत्नागिरीत वकिलांसाठी ४० तासांचे ‘मध्यस्थी प्रशिक्षण’ सुरु

- विधी सेवा प्राधिकरणाचा स्तुत्य उपक्रम!
रत्नागिरी : न्यायालयीन प्रक्रियेत मध्यस्थीचे महत्त्व वाढत असताना वकिलांसाठी एका विशेष प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. ‘महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई आणि जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, रत्नागिरी यांच्या संयुक्त विद्यमाने १७ जानेवारीपासून ४० तासांचा ‘मध्यस्थी प्रशिक्षण कार्यक्रम’ (Mediation Training Program) सुरू होत आहे. हे प्रशिक्षण शिबीर रत्नागिरीतील हॉटेल लँडमार्कच्या कॉन्फरन्स हॉलमध्ये पार पडत आहे.दि. १७ ते २१ जानेवारी या पाच दिवसांच्या कालावधीत हे प्रशिक्षण चालणार आहे.
या महत्त्वाच्या कार्यक्रमासाठी मुख्य प्रशिक्षक म्हणून नवी दिल्ली येथील सर्वोच्च न्यायालयाच्या एम.सी.पी.सी. (Mediation and Conciliation Project Committee) विभागाचे वरिष्ठ प्रशिक्षक संजीव भालेराव आणि महेश जाधव यांची विशेष नेमणूक करण्यात आली आहे.
या ४० तासांच्या सखोल प्रशिक्षणामुळे स्थानिक वकिलांना मध्यस्थी प्रक्रियेतील तंत्र आणि कौशल्ये आत्मसात करण्यास मदत होईल. तसेच, पक्षकारांमधील वाद सामोपचाराने आणि वेगाने सोडवण्यासाठी या प्रशिक्षणाचा मोठा लाभ होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.





