हुतात्म्यांच्या पागोटे गावाला महेंद्रशेठ घरत रुग्णवाहिका देणार!

- महेंद्रशेठ घरत यांची पागोटेच्या हुतात्म्यांना आगळीवेगळी आदरांजली
उरण दि १७ (विठ्ठल ममताबादे ) : उरण तालुक्यातील पागोटे येथे ४२ वा हुतात्मा स्मृतिदिन शनिवारी (ता. १७) साजरा करण्यात आला. यावेळी आंतरराष्ट्रीय कामगार नेते आणि कॉंग्रेसचे रायगड जिल्हाध्यक्ष महेंद्रशेठ घरत यांनी हुतात्म्यांना आदरांजली वाहिली.
प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी १९८४ मध्ये केलेल्या शौर्यशाली, गौरवशाली आणि ऐतिहासिक लढ्यात उरण तालुक्यातील पागोटे गावातील महादेव हिरा पाटील, केशव महादेव पाटील, कमलाकर कृष्णा तांडेल हे नवघर फाटा येथे पोलिसांच्या बेछूट गोळीबारात हुतात्मा झाले. त्यांच्या बलिदानाप्रीत्यर्थ पागोटे येथे हुतात्मा दिन साजरा केला जातो. “दिबांचे अतुलनीय योगदान आणि हुतात्म्यांच्या बलिदानामुळेच प्रकल्पग्रस्तांना साडेबारा टक्केचे भूखंड मिळालेत. त्या आंदोलनात मी विद्यार्थिदशेत असतानाही सक्रिय होतो. त्यामुळे हुतात्म्यांना आदरांजली वाहणे हे माझे प्रथम कर्तव्य आहे. दिबांच्या लढ्याच्या मार्गावर माझी वाटचाल सुरू आहे. त्यामुळे अटल सेतूसाठी संपादित जमिनीला योग्य भाव मिळावा, म्हणून लढलो आणि शेतकरी वर्गाला न्याय दिला. अनेक गावांना मैदाने मिळवून देण्यासाठी सिडकोच्या अधिकारी वर्गाला धारेवर धरतोय. त्यामुळे हुतात्म्यांचे रक्त मी वाया जाऊ देत नाही, अशाप्रकारेच काम करतोय,” असे आंतरराष्ट्रीय कामगार नेते आणि कॉंग्रेसचे रायगड जिल्हाध्यक्ष महेंद्रशेठ घरत यांनी पागोटे येथे म्हणाले.
“मॅनग्रोज प्रश्न भूमिपुत्रांच्या विकासाच्या आड येता कामा नये, सरकारने सकारात्मक विचार करावा, रोजगाराची संधी आहे. तरुणांनी कालानुरूप शिक्षण घ्यावे,” असे आमदार प्रशांत ठाकूर म्हणाले.
यावेळी कॉ. भूषण पाटील म्हणाले,”हुतात्म्यांचे स्वप्न साकार झाले नाही. जेएनपीटी प्रकल्पग्रस्तांना अद्यापही साडेबारा टक्के भूखंड मिळाले नाही. घरांचा प्रश्न गंभीर आहे.”
यावेळी माजी आमदार मनोहर भोईर, उरणच्या नवनिर्वाचित नगराध्यक्ष भावना घाणेकर, माजी नगराध्यक्ष जे. एम. म्हात्रे, दिबांचे पुत्र अतुल पाटील, कॉ. भूषण पाटील, रवी पाटील, संतोष पवार, पागोटे ग्रामपंचायतचे सरपंच कुणाल पाटील आणि सदस्य उपस्थित होते.पागोटे ग्रामविकास मंडळ, ग्रामपंचायत व ग्रामविकास सामाजिक ट्रस्ट यांच्या वतीने शालेय विद्यार्थ्यांचा सांस्कृतिक कार्यक्रम आणि कबड्डी स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी रजनीकांत पाटील यांनी प्रास्ताविक केले. अपघाताचा प्रश्न गंभीर आहे. त्यासाठी रुग्णवाहिका हवी, अशी मागणी केली. तेव्हा क्षणाचाही विलंब न लावता रुग्णवाहिका देण्याचे महेंद्रशेठ घरत यांनी जाहीर केले.





