महाराष्ट्र

विश्वबंधुत्वाचा संदेश देणारी मुंबई ते कन्याकुमारी सायकल सफर यशस्वी

दापोली : स्वामी विवेकानंद यांनी दिलेला विश्वशांती बंधुत्व हा संदेश घेऊन दापोली सायकलिंग क्लबचे सुरज भुवड आणि सचिन पालकर यांनी मुंबई ते कन्याकुमारी असा १७५० किमीचा सायकल प्रवास १४ दिवसात पूर्ण केला आहे. त्यांनी २२ जानेवारी २०२३ रोजी मुंबईहुन सायकल प्रवास सुरु केला आणि महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक, केरळ राज्यातील समुद्र किनाऱ्यावरील गावातून सायकल प्रवास करत ते ४ फेब्रुवारी २०२३ रोजी कन्याकुमारी येथे पोहोचले.

त्यांनी ही सायकल मोहीम सोबत कोणतीही बॅकअप गाडी न घेता केली आहे. स्वतःचे साहित्य स्वतःच्या सायकलवर घेऊन दररोज ८० ते १७० किमी अंतर सायकल चालवली. याबद्दल अधिक माहिती देताना त्यांनी सांगितले की दैनंदिन धावपळीच्या जीवनात ऑफिस नोकरी सुरु असताना स्वतःसाठी थोडा वेळ काढून ही १४ दिवसाची सायकल मोहीम आखली गेली. मार्गावरील नवीन प्रदेश, तिथली संस्कृती, जीवनशैली यांचा अनुभव आस्वाद घेण्यासाठी सायकल प्रवास हा एक चांगला पर्याय आहे. ठिकठिकाणी स्थानिक नागरिकांकडून स्वागत पाहुणचार झाला. पर्यावरण रक्षण, सायकलचे महत्व, स्वामी विवेकानंदानी जगाला दिलेला बंधुत्वाचा संदेश याबद्दल प्रबोधन चर्चा जनजागृती करत आणि अनेक स्थानिक विषयांवर गप्पा गोष्टी करत हा आनंददायी असा, न विसरता येणारा सायकल प्रवास झाला. अनेक नवीन माणसे जोडली गेली, नवीन मित्र मिळाले.

दापोली आंबवली गावातील सुरज भुवड वय २५ हा आयआयटी मुंबई येथे नोकरीस असून प्रभादेवी येथील सचिन पालकर वय ४३ यांचा स्वतःचा व्यवसाय आहे. घरच्यांचा पाठिंब्यामुळेच अशा आव्हानात्मक सायकल मोहीमेचे नियोजन शक्य झाले असे त्यांचे म्हणणे आहे. ही सायकल मोहीम यशस्वीपणे पूर्ण केल्याबद्दल त्यांचे कौतुक होत आहे.

Team RatnagiriLive

कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button