रत्नागिरीतील उद्याच्या रोजगार मेळाव्यात दीडशेहून अधिक कंपन्या सहभागी होणार
जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांनी घेतला सविस्तर आढावा
रत्नागिरी : राज्याचे उद्योग मंत्री तथा रत्नागिरी व रायगड जिल्हयाचे पालकमंत्री उदय सामंत आणि रत्नागिरी जिल्हा प्रशासनाद्वारे शहरातील रा.भा. शिर्के प्रशाला, माळनाका येथे रविवार 12 फेब्रुवारी 2023 रोजी भव्य रोजगार महामेळावा आयोजित करण्यात आला आहे. शनिवारी जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह यांनी कार्यक्रमस्थळी प्रत्यक्ष भेट देवून भव्य रोजगार मेळाव्याच्या अनुषंगाने सुरु असलेल्या तयारीचा सविस्तर आढावा घेतला.
यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी किर्तीकिरण पूजार, अपर जिल्हाधिकारी शुभांगी साठे , अतिरिक्त मुख्य कार्यकारी परिक्षीत यादव, कोकण विभागाचे उद्योग सहसंचालक सतीश भामरे, जिल्हा उद्योग केंद्राच्या महाव्यवस्थापक विद्या कुलकर्णी, रायगड जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक जी.एस. हरळय्या, पालघर जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक उध्दव माने इतर विभागांचे अधिकारी तसेच युवा हब एजन्सीचे किरण रहाणे व त्यांची टिम उपस्थित होती.
या रोजगार मेळाव्यात कोकण विभागातील विविध जिल्हयातील 150 पेक्षा जास्त कंपन्या सहभागी होणार आहे. जिल्हयातील तरुण तरुणींना या रोजगार मेळाव्याच्या माध्यमातून नोकरीची सुवर्णसंधी उपलब्ध होत आहे. हा मेळावा सकाळी 08 ते सायंकाळी 05 वाजेपर्यंत रा. भा. शिर्के प्रशाला, शामराव पेजे चौक, जुना माळनाका, रत्नागिरी येथे होणार आहे.
तरी जिल्हयातील तरुण- तरुणींनी या संधीचा लाभ घ्यावा, असे जिल्हा प्रशासनाकडून आवाहन करण्यात येत आहे.