महाराष्ट्र

उष्माघातामुळे होणारे मृत्यू टाळण्यासाठी राष्ट्रीय कृती आराखडा तयार करणार

राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणचे सदस्य सचिव कमल किशोर यांची माहिती

मुंबई, दि. 13 : उष्माघातामुळे होणारी जीवित हानी रोखण्यासाठी पूर्वनियोजन आणि राष्ट्रीय मार्गदर्शक तत्त्वांची प्रभावी अंमलबजावणी गरजेचे असल्याचे मत राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणचे सदस्य सचिव कमल किशोर यांनी मांडले.

भारतीय तंत्रज्ञान संस्था (आयआयटी, मुंबई) पवई येथे ‘उष्णतेच्या लाटा राष्ट्रीय कार्यशाळा 2023’ आयोजित कार्यशाळेत कमल किशोर बोलत होते. राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, मुंबई, भारतीय तंत्रज्ञान संस्था, नागपूर, विश्वेश्वरैय्या राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्था आणि महाराष्ट्र शासनाचे राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 13 आणि 14 फेब्रुवारी 2023 रोजी या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. मदत व पुनर्वसन विभागाचे प्रधान सचिव असीमकुमार गुप्ता, राज्य आपत्ती व्यवस्थापनचे संचालक अप्पासाहेब धुळाज, देशातील विविध राज्यातील व महाराष्ट्रातील विविध मान्यवर तज्ज्ञ कार्यशाळेत सहभागी आहेत.

श्री. कमल किशोर म्हणाले की, गेल्या काही वर्षांपासून जगभरात उष्णतेच्या लाटा वाढत आहेत, ज्यामुळे लोकांच्या आरोग्यावर खूप मोठे परिणाम होत आहेत. राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने (NDMA) भारतातील अति उष्णतेच्या लाटेशी संबंधित कार्यक्रमाची अंमलबजावणी, समन्वय आणि मूल्यमापनासाठी कृती आराखडा तयार करण्यासाठी राष्ट्रीय मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. यामध्ये वेळोवेळी सुधारणा करण्यात आली आहे. या क्षेत्रात काम करणारे अभ्यासक यांनी एकत्र येऊन उष्णतेच्या लाटांमुळे होणारी हानी टाळण्यासाठी तत्काळ नियोजन, प्रभावी कृती आराखडा तयार करणे या अनुषंगाने कार्यशाळेत चर्चा व मार्गदर्शन यातून एक चांगले विचारमंथन घडून येईल, असेही कमल किशोर म्हणाले.

Team RatnagiriLive

कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button