छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती त्यांच्या विचारांनी साजरी व्हावी
काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष महेंद्रशेठ घरत यांचे प्रतिपादन
उरण (विठ्ठल ममताबादे ) : ‘जय शिवराय’ या शिव व्याख्याते प्रशांत देशमुख लिखित पुस्तकाच्या चौथ्या आवृत्तीचे प्रकाशन रायगडचे माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या शुभहस्ते आज शिवजयंती निमित्ताने गव्हाण कोपर येथील शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार घालुन शिवाजी महाराजांना वंदन करण्यात आले.
यावेळी रायगड जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष तथा कामगार नेते महेंद्रशेठ घरत यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले की, शिवजयंती साजरी करत असतांना महाराजांचे विचार तळागाळातील व्यक्ती पर्यंत पोहचणे गरजेचे आहे. त्यांचे विचार जीवनात अंगीकृत करून त्याप्रमाणे आपल्या सार्वजनिक जीवनात ते विचार अमलात आणले तर नक्कीच खऱ्या अर्थाने आपण शिवजयंती साजरी करण्याचे आपल्याला समाधान मिळेल व महाराजांना ती खरी आदरांजली ठरेल.
यावेळी महेंद्रशेठ घरत यांनी २०० प्रति घेऊन त्या विविध क्षेत्रातील मान्यवर व्यक्ती, शासकीय सनदी अधिकारी यांना देण्याचा मानस केला आहे. त्याच बरोबर गेल्या वर्षी याच पुस्तकाच्या ३०० प्रति त्यांनी स्वतः विकत घेऊन महाराष्ट्रातील सर्व आजी माजी मुख्यमंत्री, कॅबिनेट मंत्री, राज्य मंत्री, शासकीय अधिकारी, कामगार, यांना भेट म्हणून दिल्या आहेत.त्यांच्या याच कार्याबद्दल या पुस्तकाचे लेखक,प्रसिद्ध शिवव्याख्याते प्रशांत देशमुख यांनी सांगितले की, रायगड जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष महेंद्र घरत यांनी शिवजयंतीच्या निमित्ताने शिवप्रेमींना भेट म्हणून देण्यासाठी जय शिवराय या पुस्तकाच्या ५०० प्रति स्वखर्चाने विकत घेतल्या. आमच्या राजांची शिवजयंती विचाराने साजरी व्हावी यासाठी महेंद्रजी घरत यांचे सहकार्य खरोखरच कौतुकास्पद आहे. विचारांवर विश्वास ठेवणाऱ्या आपल्यासारख्या माणसांची संख्या राजकारणात वाढायला हवी.असे प्रशांत देशमुख यांनी शेवटी सांगितले.