महाराष्ट्र
भाजपा सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणांमुळे शेतमालाला भाव नाही : नाना पटोले
मुंबई : देशात २०१४ पासून लोकशाही व्यवस्था, संविधान, नियम कायदे पायदळी तुडवून मनमानी कारभार सुरु आहे. सर्व यंत्रणा मोदी सरकारने हातच्या बाहुल्या बनवल्या असून विरोधी पक्षांचा आवाज दडपण्यासाठी सत्तेचा वारेमाप गैरवापर केला जात आहे. लोकशाही, संविधान वाचवण्यासाठी काँग्रेस पक्षाने पुढाकार घेतलेला असून भाजपा विरोधात लढण्यासाठी जे पक्ष एकत्र येतील त्यांना बरोबर घेण्याची काँग्रेस पक्षाची भूमिका आहे, असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी स्पष्ट केले आहे.
प्रसार माध्यमांशी बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले की, देशातील सर्व स्वायत्त संस्थांमध्ये मोदी सरकारचा हस्तक्षेप वाढलेला आहे, न्याय व्यवस्थाही यातून सुटलेली नाही, निवडणूक आयोगाची स्थिती आपण पाहतच आहोत, सुप्रीम कोर्टाला त्यात लक्ष घालावे लागले, प्रशासकीय व्यवस्थेतही प्रचंड़ हस्तक्षेप केला जात आहे. देशातील सध्याची राजकीय परिस्थीती चिंताजनक आहे म्हणूनच लोकशाही व्यवस्था अबाधित रहावी, संविधान वाचले पाहिजे यासाठी काँग्रेस पक्षाने पुढाकार घेतला असून रायपूरमध्ये नुकत्याच झालेल्या महाधिवेशनात राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे व खा. राहुल गांधी यांनी यासंदर्भात पक्षाची भूमिका मांडलेली आहे. भारतीय जनता पक्षाच्या विरोधात लढण्यासाठी जे राजकीय पक्ष बरोबर येतील त्यांना सोबत घेण्याची काँग्रेसची भूमिका आहे.