ऐका हो…ऐका…! लोककल्याणकारी योजनांचा गावोगावी जागर!
शासनाच्या योजनांसाठी लोककलांच्या माध्यमातून जागृती
रत्नागिरी : शासनाच्या विविध योजनांची माहिती जनतेपर्यंत पोहचविण्यासाठी रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालय व जिल्हा माहिती कार्यालयातर्फे जिल्ह्यात शासनाच्या जन कल्याणकारी योजनांचा लोककलांच्या माध्यमातून जागर करण्यास उत्साहाने प्रारंभ करण्यात आला.
सर्वसामान्य जनतेसाठीच्या योजना सोप्या आणि स्थानिक लोकभाषेत सांगितल्या की, त्या लोकांपर्यंत लवकर पोहोचतात. भाकर संस्था लांजा, संगमेश्वर तालुका सांस्कृतिक कलामंच देवरुख व शाहीर रत्नाकर महाकाळ लोककला मंच खेड या संस्थानी आज कार्यक्रम सादर करण्यास सुरुवात केली आहे.
आज राजापूर तालुक्यातील नाटे, धाऊलवल्ली व भालावली या गावांमध्ये, खेड तालुक्यातील दाभिळ, खेड बसस्थानक, तीन बत्ती नाका आणि चिपळूण तालुका या ठिकाणी लोककलेचे कार्यक्रमांचे सादरीकरण करण्यात आले आहे.
महिला व बाल विकास विभागांच्या योजना, जननी सुरक्षा योजना, प्रधानमंत्री मातृवंदना योजना, मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम, कृषी विभागाच्या योजना अशा विविध योजनांच्या माहितीचा यात समावेश आहे.
जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यामध्ये सुरु झालेल्या या लोकजागराचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा माहिती अधिकारी मनोज शिवाजी सानप यांनी केले आहे.