रायगडच्या दोन विज्ञान शिक्षकांचा ‘नॅशनल एज्युकेशन इनोव्हेशन अवॉर्ड-२०२३’ ने सन्मान!
उरण दि १२ (विठ्ठल ममताबादे ): स्टेट इनोव्हेशन अँड रिसर्च फाऊंडेशन महाराष्ट्र आयोजित राष्ट्रीय स्तरावरील शिक्षण परिषदेत रयत शिक्षण संस्थेच्या रायगड विभागातील दोन विज्ञान शिक्षकांना ‘नॅशनल एज्युकेशन इनोव्हेशन अवॉर्ड-२०२३’ने सन्मानित करण्यात आले. उरण तालुक्यातील पिरकोन गावचे नवोपक्रमशील शिक्षक तुषार चंद्रकांत म्हात्रे (जूचंद्र विद्यालय) यांच्या ‘रोबोटिक्सच्या विश्वात’ या नावीन्यपूर्ण उपक्रमाबद्दल इनोव्हेशन अवॉर्ड प्राप्त झाला तर श्री छत्रपती शिवाजी विद्यालय जासई, तालुका उरण येथील शैक्षणिक फेलोशीपप्राप्त विज्ञान शिक्षिका शशिकला पाटील यांच्या ‘बटरफ्लाय लाईफ’ या उपक्रमास गौरवण्यात आले.
सिंहगड इन्स्टिट्यूट, सोलापूर येथे संपन्न झालेल्या कॉन्फरन्समध्ये महाराष्ट्रासह, केरळ, आंध्रप्रदेश, कर्नाटक, गुजरात इत्यादी राज्यातील शिक्षकांचा सहभाग होता. सदर कॉन्फरन्समध्ये पद्मश्री गिरीशजी प्रभुणे, ज्येष्ठ शास्त्रज्ञ अरविंद नातू, दीपक माळी (एमएसईआरटी पुणे), डॉ. ह. ना. जगताप, दत्तात्रेय वारे इत्यादी मान्यवरांच्या हस्ते पुरस्कारांचे वितरण झाले.
रायगड विभागातील शिक्षकांच्या गौरवाबद्दल सदर शिक्षकांचे शाळांद्वारे अभिनंदन करण्यात आले.पुरस्कार प्राप्त तुषार म्हात्रे व शशिकला पाटील यांच्यावर शुभेच्छा व अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.