रत्नागिरी- सैतवडे एसटी बससेवा पूर्ववत सुरू करण्याची मागणी
वाहतूक अधिकारी राकेश पवार यांना निवेदन
रत्नागिरी : सैतवडे येथून लोकांची जिल्ह्याच्या ठिकाणी कामानिमित्त नियमित प्रवास करतात. कोरोना काळात सैतवडे गुंबद पेठ मोहल्लापर्यंत येणाऱ्या सर्व एसटी गाड्या बंद करण्यात आल्या होत्या. प्रवाशांची गैरसोय होत असल्याने सैतवडे गुंबद पेठ मोहल्लापर्यंत एसटी बस सेवा पूर्ववत सुरू करण्याबाबतचे निवेदन गुरुवारी वाहतूक अधिकारी राकेश पवार यांना देण्यात आले. यावेळी समीर काळे उपस्थित होते.
रत्नागिरी तालुक्यातील सैतवडे गाव हे महसूल गाव म्हणून ओळखले जाते. या गावातून गुहागर तालुक्यातील पडवे, कुडली या भागातील लोक कामानिमित्त सैतवडे गावात येणाऱ्या एसटी गाड्यांवर अवलंबून असतात. हा परीसर मच्छीमारांसाठी ओळखला जातो. त्यामुळे एसटी बस या भागातील लोकांची जीवन वाहिनी आहे. पण कोरोना काळामध्ये सैतवडे गुंबद पेठ मोहल्लापर्यंत येणाऱ्या सर्व एसटी गाड्या पूर्णपणे बंद करण्यात आल्या होत्या. त्यानंतर काही गाड्या पुन्हा कार्यरत करण्यात आले आहे परंतु रत्नागिरी आगारातून दुपारी १२-०० वाजता व ३-०० वाजता सुटणारी गाडी ही सैतवडे पोस्टापर्यंत येऊन तिथूनच परत जाते. गुंबद पेठ मोहल्लापर्यंत ही गाडी येत नाही. त्यामुळे सर्व प्रवाशांना नाहक आर्थिक व मानसिक त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे ही ही एसटी गाडी पोस्टाजवळून न जाता पुढे पेठ मोहल्लापर्यंत नेण्यात यावी तसेच सैतवडे गावामध्ये वस्तीची गाडी उपलब्ध करून द्यावी. वाहक व चालक यांची राहण्याची पाण्याची व्यवस्था गुंबद ग्रामपंचायत मार्फत करण्यात येणार आहे.
या बाबत निवेदन सैतवडे गावचे माजी पोलीस पाटील इब्राहिम मुल्ला व सामाजिक कार्यकर्ते अजीज मुकादम यांनी रत्नागिरी येथील एसटी विभागीय कार्यालयामध्ये वाहतूक अधिकारी राकेश पवार, एटीआय समीर काळे यांना निवेदन देऊन संपूर्ण वस्तुस्थिती कथन केली. संबंधित अधिकाऱ्याने सांगितले की सैतवडे गावासाठी लवकरच एसटी सुरू करून पेठ मोहल्लापर्यंत जाण्यासाठी वाहक चालकांना सूचना देणार असल्याचे सांगितले. त्यामुळे लवकरच सैतवडे गावामध्ये एसटी गाड्यांची ये-जा सुरू होणार आहे