आशाताई भोसले म्हणजे महाराष्ट्राची शान : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची उपस्थिती
मुंबई : गेल्या आठ दशकांपासून रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजविणाऱ्या मंगेशकर कुटुंबीयांनी गायन आणि संगीताच्या माध्यमातून कला क्षेत्राची सेवा बजावली आहे. या कुटुंबातील एक घटक असलेल्या आशा भोसले यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान करताना आनंद होत आहे. आशाताई भोसले या महाराष्ट्राची शान आहेत, असे गौरवोद्गार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी येथे काढले.
राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागातर्फे आज सायंकाळी गेट वे ऑफ इंडियाच्या प्रांगणात ख्यातनाम गायिका आशा भोसले यांना सन २०२१ चा महाराष्ट्र भूषण पुरस्कार मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते.
शाल, सन्मानचिन्ह, मानपत्र आणि २५ लाख रुपये रोख असे पुरस्काराचे स्वरूप आहे. यावेळी विधानसभेचे अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मुंबई शहरचे पालकमंत्री दीपक केसरकर, सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार, ख्यातनाम क्रिकेटपटू, भारतरत्न सचिन तेंडुलकर, मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव, सांस्कृतिक कार्य विभागाचे प्रधान सचिव विकास खारगे आदी उपस्थित होते.