गुहागर किनाऱ्यावरील कासव संवर्धन मोहिमेचे दोन विक्रम!
द्विशतकी घरटी संरक्षित आणि एकाच वेळी १६२ पिल्ले समुद्रात सोडले
गुहागर : येथील कासव संवर्धन केंद्रात 19 मार्चला 200 घरटी संरक्षित करण्यात आली आहेत. एका हंगामात एवढी घरटी संरक्षित होण्याची कोकण किनारपट्टीवरील ही पहिलीच वेळ आहे. तसेच गुहागर समुद्रकिनाऱ्यावरुन 18 मार्चला सायंकाळी 162 पिल्लांना समुद्रात सोडण्यात आले. कासव संवर्धन सुरु झाल्यापासून इतकी पिल्ले एकाच दिवशी सोडण्याची ही पहिलीच वेळ आहे.
दरवर्षी ऑक्टोबर नोव्हेंबर महिन्यात घरटी सापडण्यास सुरवात होते. परंतु यावर्षी डिसेंबर महिन्यात ऑलिव्ह रिडले कासवे अंडी देण्यासाठी गुहागरच्या समुद्रकिनाऱ्यावर येण्यास सुरवात झाली. 7.5 कि.मी. लांबीच्या समुद्रकिनाऱ्यावर जानेवारी अखेर दररोज घरटी सापडत होती. त्यामुळे 100 घरट्यांचा आकडा 17 फेब्रुवारीपर्यंत पूर्ण झाला. विशेष म्हणजे फेब्रुवारी महिन्याच्या तिसऱ्या आणि चौथ्या आठवड्यात तर एकेका दिवशी पाचपेक्षा अधिक घरटी सापडत होती. 26 फेब्रुवारीला एकाच दिवशी 10 घरटी सापडली. 17 फेब्रुवारी ते 28 फेब्रुवारी या दरम्यान अवघ्या 11 दिवसांत 70 घरटी सापडली. मार्च महिन्यात घरटी सापड्याचा वेग कमी झाला. 19 मार्चला कासव संवर्धन केंद्रात 200 वे घरटे संवर्धित करण्यात आले. आज ऑलिव्ह रिडले कासवांची 21 हजार 402 गुहागरमध्ये संवर्धित करण्यात आली आहेत.
गुहागरच्या कासव संवर्धन मोहिमेमध्ये आणखी एका विक्रमाची नोंद झाली आहे. 18 मार्चला एकाच वेळी सर्वाधिक 162 पिल्लांना समुद्रात सोडण्यात आले. गुहागर किनारपट्टीवरील ही पहिलीच वेळ आहे. शनिवारी 18 मार्चला चार घरट्यातील अंड्यांमधुन पिल्ले बाहेर पडण्यास सुरवात झाली. सायंकाळपर्यंत 162 पिल्लांचा जन्म झाला होता. या सर्व पिल्लांना सायंकाळी समुद्रात सोडण्यात आले.
देशाच्या पश्चिम किनारपट्टीवर ऑलिव्ह रिडले कासव संवर्धन मोहिम प्रभावीपणे राबवणारे महाराष्ट्र हे एकमेव राज्य आहे. महाराष्ट्रात सर्वांधिक कासव संवर्धन रत्नागिरी जिल्ह्यात होते. त्यामुळे एकाच हंगामात 200 घरटी मिळणे हा पश्चिम किनारपट्टीवरील विक्रम आहे.
गुहागरमध्ये ऑलिव्ह रिडले कासव संवर्धन मोहिम गेली 16 वर्ष सुरु आहे. 2007-08 मध्ये सह्याद्री निसर्ग मित्र या संस्थेचे भाऊ काटदरे यांनी कासव संवर्धन मोहीम सुरु केली. 2012-13 मध्ये वन खात्याने हा उपक्रम आपल्या खात्यामार्फत सुरु केला. 2021-22 पर्यंत वन खात्याने केवळ दोन कासवमित्र नियुक्त केले होते. यावर्षी ही संख्या वाढवली. संजय भोसले, प्रसन्न लोंढे, रविंद्र बागकर, लतिश शेटे आणि विक्रांत सांगळे या पाचजणांना वन खात्याने कासवमित्र म्हणून नियुक्त केले आहे. डिसेंबर 2022 पासून दररोज पहाटे 5 ते 8 आणि सायंकाळी 6 ते 8 या वेळेत हे कासवमित्र 7.5 कि.मि.च्या समुद्रकिनाऱ्यावर गस्त घालून कासवांची घरटी शोधुन संरक्षित करतात. त्यांच्या मेहनतीमुळेच कासव संवर्धन मोहिमेला यश आले आहे.