संगमेश्वरच्या राममंदिरात महिलांनी गायले रामरक्षा स्तोत्र!
संगमेश्वर : संगमेश्वर येथील रामपेठ भागात असणाऱ्या श्रीराम मंदिरात श्रीराम नवमीनिमित्त महिलांनी श्रीरामरक्षा गाऊन रामतांडव स्तोत्र म्हणत श्रीरामांचा जप केला आणि आगळ्यावेगळ्या पध्दतीने रामनवमी उत्सव साजरा केला.
संगमेश्वर परिसरातील महिलांनी डॉक्टर जयश्री जोग यांच्या संकल्पनेतून यावर्षीच्या रामनवमीला रामपेठ येथील श्रीराम मंदिरात श्रीरामरक्षा पठण आणि श्रीराम तांडव स्तोत्र म्हणण्याचा उपक्रम हाती घेतला होता . यासाठी परिसरातील महिलांनी गेले काही दिवस दररोज ठरावीक वेळेला श्रीरामरक्षा आणि श्रीराम तांडव स्तोत्र म्हणण्याचा सराव सुरु ठेवला होता. रामनवमीच्या दिवशी रामपेठ येथील श्रीराम मंदिरात परिसरातील महिला एकत्र आल्या आणि त्यांनी अत्यंत भक्तिपूर्ण वातावरणात एका ताला सुरात रामरक्षा आणि रामतांडव स्तोत्र गायले.
याबरोबरच श्रीराम जयराम जयजयरामचा गजर देखील केला. रामरक्षा आणि राम तांडव स्तोत्र रामनवमीला एकत्र म्हणण्यामागील संकल्पना यावेळी डॉ. जयश्री जोग यांनी आपल्या मनोगतातून स्पष्ट केली . या उपक्रमाचे रामपेठवासियांनी स्वागत करुन सर्व महिलावर्गाचे कौतूक केले.