रत्नागिरीचे सुपुत्र समीर गुरव यांची भाजपच्या प्रदेश कार्यकारिणीवर नियुक्ती
मुंबई : भारतीय जनता पार्टीच्या प्रदेश कार्यकारिणीच्या सदस्यपदी मूळचे रत्नागिरी तालुक्यातील रिळ गावचे सुपुत्र असलेल्या समीर गुरव यांची निवड करण्यात आली आहे. प्रदेशाध्यक्ष.चंद्रशेखर बावनकुळे यांनी श्री. गुरव यांना भाजपा प्रदेश कार्यकारिणी सदस्य म्हणून संधी दिली.
पक्षाची देशभरात घोडदौड सुरु असताना ही अशी जबाबदारी मिळणे हा मोठा बहुमान आहे, अशी प्रतिक्रिया या निवडीनंतर समीर गुरव यांनी व्यक्त केली आहे. मा. बावनकुळे यांनी अत्यंत विश्वासाने सोपविलेल्या या जबाबदारीचे मी झोकून देऊन निर्वहन करीन. त्यांचा विश्वास पूर्ण क्षमतेने सार्थ ठरवीन. कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसलेल्या माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला ही संधी दिल्याबद्दल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचे त्यांनी आभार मानले आहेत.
समीर गुरव यांच्यावर अलीकडेच भाजपा महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ते पदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. त्या आधीपासून श्री. गुरव यांना पक्षात भाजपा सोशल मीडिया विभाग सांभाळण्याचा दीर्घ अनुभव आहे.