नवनिर्माणच्या प्री प्रायमरी स्कूलतर्फे गुड टच बॅड टच सेमिनार उत्साहात
रत्नागिरी : नवनिर्माण संस्थेच्या टीनी टॉटस प्रि प्रायमरी स्कूलतर्फे गुड टच बॅड टच सेमिनारचे आयोजन करण्यात आले होतें. हे सेमिनार शनिवार दि. १५ जुलै रोजी पार पडले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून अन्वी अभिजित शिंदे उपस्थित होत्या.
या कार्यक्रमाच्या अध्यक्ष मुख्याध्यापक नजमा मुजावर होत्या.कार्यक्रमाला विद्यार्थी, पालक, शिक्षक उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मनुश्री राणे यांनी केले. प्रस्ताविकात त्यांनी शाळेच्या उपक्रमाविषयी माहिती दिली. यावेळी अन्वी शिंदे यांनी चांगला स्पर्श वाईट स्पर्श कसा ओळखावा याविषयीची माहिती दिली. त्याचबरोबर यासंदर्भात विद्यार्थ्यांना एक चित्रफीत दाखवली. विविध दाखले देत चाईल्ड हेल्पलाइनविषयी पालकांसह विद्यार्थ्यांशी संवाद साधला.
यावेळी पालकांकडून प्रतिनिधिक मनोगत व्यक्त करण्यात आले. पालक निलेश गराटे यांनी मनोगत व्यक्त करताना शाळेच्या विविध उपक्रमांचे कौतुक केले. विद्यार्थी आणि पालक यांच्यासाठी आयोजित केलेल्या या उपक्रमाबद्दल संस्थेचे आभार व्यक्त केले. अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना नजमा मुजावर म्हणाल्या, पालक आणि विद्यार्थी यांच्याशी संवाद साधण्यासाठी असे उपक्रम गरजेचे असतात. अश्या उपक्रमातून शाळा जनजागृती करत असते. शाळा असे उपक्रम राबविण्यासाठी कटीबद्ध असल्याचे त्यांनी सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन लुबना दवे यांनी केले.