दादर-रत्नागिरी पॅसेंजरबाबत गणेशोत्सवापर्यंत ‘गुड न्यूज’ मिळणार?
- खा. विनायक राऊत घेणार मध्य रेल्वेच्या महाव्यवस्थापकांची भेट
रत्नागिरी : सुमारे दोन दशकांपेक्षा अधिक काळ सुरू असलेली आणि कोरोनाच्या नावाखाली रेल्वेने मागच्या दाराने गाडी सुटण्याच्या ठिकाणात केलेल्या बदलामुळे प्रवासी जनतेची होणारी गैरसोय लक्षात घेऊन रत्नागिरी सिंधुदुर्गचे खासदार विनायक राऊत हे मध्य रेल्वेच्या महाव्यवस्थापकांची भेट घेऊन सध्या रत्नागिरी ते दिव्यापर्यंत धावणारी गाडी पूर्वीप्रमाणे दादरपर्यंत नेण्यासंदर्भात चर्चा करणार आहेत. येत्या गणेशोत्सवात कोणत्याही परिस्थितीत ही गाडी दादरपर्यंत नेण्यासचे प्रयत्न केले जातील, असा खा. विनायक राऊत यांचा आग्रह आहे. या प्रयत्नांना यश आल्यास मुंबईच्या पश्चिम उपनगरातील कोकणवासियांची मोठी गैरसोय टळणार आहे.
कोकण रेल्वे सुरू झाल्यापासून मुंबईतील दादर ते रत्नागिरीपर्यंत सुरू असलेली (५०१०३/५०१०४) ही गाडी कोरोना संकट काळात दादरपर्यंत नेण्याऐवजी रेल्वेकडून तिच्या वक्तशीरपणाचे कारण देत दिव्यातच थांबवण्यात आली. पूर्वी या गाडीमुळे दादर ते रत्नागिरी दरम्यान प्रवास करणाऱ्या व मुंबईच्या पश्चिम उपनगरात राहणाऱ्या प्रवाशांची चांगली सोय होत होती. मात्र आता ही गाडी दिव्यातूनच रत्नागिरीसाठी सुटत असल्यामुळे दादरसह बोरिवली- विरार पर्यंतच्या प्रवासी जनतेची गैरसोय होत आहे.
प्रवाशांची ही गैरसोय लक्षात घेऊन ही गाडी पूर्वीप्रमाणेच दादर पर्यंत चालवावी यासाठी प्रवासी जनतेकडून जोरदार मागणी केली जात आहे. मात्र, मध्य रेल्वे फलाट उपलब्ध नाही सांगून तर आणि या संदर्भात मध्य रेल्वेकडे प्रस्ताव पाठवला आहे, अशी थातूरमातूर उत्तरे देऊन कोकण रेल्वे याकडे कानाडोळा करत आहे.
या पार्श्वभूमीवर रत्नागिरी सिंधुदुर्गचे खासदार विनायक राऊत हे मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक यांची भेट घेऊन त्यांच्याशी यासंदर्भात चर्चा करणार आहेत. रत्नागिरी दिवा पॅसेंजरसह सावंतवाडी -दिवा गाडी देखील दिव्यासाठी पुरेसे डबे राखीव ठेवून दादर टर्मिनस येथून सोडण्याची ते मागणी करणार आहेत. तोंडावर येऊन ठेपलेल्या गणेशोत्सवापूर्वी या गाड्यांच्या संदर्भातील वाढत्या मागण्याची दखल घेऊन कोकणवासीयांना गुड न्यूज देण्याच्या दृष्टीने खासदार राऊत यांचे प्रयत्न आहेत.