रत्नागिरी आगारातून सुटणाऱ्या सर्व ग्रामीण एसटी फेऱ्या रेल्वे स्टेशन मार्गे
- गणेशोत्सवासाठी प्रवाशांच्या सोयीसाठी नियोजन
- १४ सप्टेंबरपासून ग्रामीण फेऱ्या स्टेशन मार्गे
रत्नागिरी : गणेशोत्सव निमित्त मुंबई व उपनगरांतून जादा गाड्या कोकणात येणार आहेत. मुंबईतून रेल्वेने येणाऱ्या रत्नागिरी रेल्वेस्थानकावरील प्रवाशांच्या सोयीसाठी दि. १४ सप्टेंबरपासून रत्नागिरीतील रहाटाघर बसस्थानकातून सुटणाऱ्या राजापूर, देवरूख, लांजा मार्गावरील सर्व ग्रामीण फेऱ्या रत्नागिरी रेल्वे स्थानकवरून पुढे मार्गस्थ होणार आहेत.
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाकडून मुंबई , बोरिवली, नालासोपारा, पुणे या मार्गावर जादा गाड्यांची सुविधा आहे. रत्नागिरी रेल्वेस्थानकावर गणेशभक्त प्रवाशांच्या सोयीसाठी दि. १९ सप्टेंबर ते दि. १ ऑक्टोबरपर्यंत रत्नागिरी आगारातून तात्पुरत्या स्वरूपाचा वाहतूक नियंत्रण कक्ष उभारून तेथे प्रवासाची माहिती व मार्गदर्शनासाठी वाहतूक नियंत्रक नियुक्त करण्यात येणार आहे. शिवाय गणेशोत्सवानंतर परतीसाठी दि. २३ सप्टेंबर ते दि. १ ऑक्टोबरपर्यंत सर्व आगारांतून जादा वाहतूक सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे.
प्रवाशांच्या मागणीनुसार ग्रुप बुकिंग असल्यास इच्छित ठिकाणापासून ४२ आसनी गाडी देण्यात येणार आहे. महिलांना ५० टक्के सवलत, ७५ वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांना मोफत तर ६५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना ५० टक्के ही सवलत गणेशोत्सवात प्रथमच मिळत आहे.