राष्ट्रीय तायक्वांदो स्पर्धेत स्वरा साखळकरला कास्य पदक
रत्नागिरी : रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीची रा.भा. शिर्के प्रशालेतील कुमारी स्वरा विकास साखळकर हिने राष्ट्रीय तायक्वांदो स्पर्धेत दोन कांस्य पदकांची कमाई केली. उत्तरप्रदेशमधील गाझियाबाद जिल्ह्यातील नोयडा येथे दि. ५ ते ८ ऑक्टोबर २०२३ रोजी ओपन नॅशनल तायक्वांदो चॅम्पियनशिपचे आयोजन करण्यात आले होते.
देशभरातून विविध अनेक खेळाडू या स्पर्धेकरीता दखल झाले होते. रत्नागिरीमधील एसआरके तायक्वांदो क्लबची खेळाडू स्वरा साखळकर हिने 2 कास्यपदके मिळवून रत्नागिरीचे नाव नोएडा मध्ये झळकावले.
स्वरा हिने आजपर्यंत जिल्हास्तरीय आणि राज्यस्तरीय स्पर्धेत अनेकवेळा विशेष ठसा उमटवला होता. स्वरा हिने आजपर्यंत जिल्हास्तरीय स्पर्धेत 23 सुवर्णपदके,2 रौप्य तर 4 कास्यपदके तर राज्यस्तरीय स्पर्धेत 1 सुवर्णपदक तर 1 रौप्य पदक मिळविले आहे. नोएडा येथील राष्ट्रीय स्पर्धेसाठी प्रथमच खेळताना स्वरा हिने पुमसे प्रकारात एक कांस्यपदक तर क्युरोगी प्रकारात एक कांस्यपदक मिळवून 2 पदके आपल्या नावावर केली.
या स्पर्धेकरीता स्वरा हिला एसआरके तायक्वांदो क्लबचे मुख्य प्रशिक्षक व अध्यक्ष शाहरुख शेख यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.स्वरा ही शिर्के हायस्कूलची विद्यार्थिनी असून इयत्ता 5 वी मध्ये शिकत आहे. स्वराच्या या यशाबद्दल सर्वच स्तरातून तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. नोएडा येथील या स्पर्धेत स्वराने मिळवलेल्या यशाबद्दल र.ए. सोसायटीचे सर्व पदाधिकारी, शिर्के प्रशालेचे मुख्याध्यापक श्री. रमेश चव्हाण, उपमुख्याध्यापक श्री. कुमारमंगल कांबळे, पर्यवेक्षिका सौ. पूनम जाधव आणि सर्व शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.