कोकणातून धावणाऱ्या आणखी एका गाडीला उद्यापासून जादा डबा
रत्नागिरी : कोकण रेल्वे मार्गे धावणार्या आणखी एका एक्स्प्रेस गाडीला अतिरिक्त डबा जोडण्यात येणार आहे. पोरबंदर ते कोचुवेली या गाडीला स्लीपर श्रेणीचा जादा डबा जोडून प्रवाशांना दिलासा देण्याचा प्रयत्न रेल्वेने केला आहे.
या संदर्भात कोकण रेल्वेकडून प्राप्त माहितीनुसार पोरबंदर ते कोचुवेली (20910) या गाडीला दि. 23 नोव्हेंबरच्या फेरीसाठी तर कोचुवेली ते पोरबंदर (20909) या परतीच्या प्रवासात असतान दि. 26 नोव्हेंबर 2023 च्या फेरीसाठी स्लीपर श्रेणीचा एक जादा डबा जोडण्यात येणार आहे.
पर्यटन हंगामामुळे कोकण रेल्वे मार्गावरील सर्वच गाड्या या प्रवाशांच्या गर्दीने भरुन जात आहेत. यामुळे अनेक प्रवाशांना वेटींगची तिकिटे काढून प्रवास करावा लागत आहे. ही परिस्थिती लक्षात घेऊन रेल्वेने आधीच धावत असलेल्या गाड्यांना अतिरिक्त डबे जोडून अशा प्रवाशांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे. पोरबंदर ते कोचुवेली एकस्प्रेसप्रमाणे इतरही अनेक गाड्यांना रेल्वेने अतिरिक्त डबे जोडले आहेत.