युनायटेड इंग्लिश स्कूल चिपळूणच्या गुरुकुल विभागाचे मातृभूमी परिचय शिबिर संपन्न
संगमेश्वर दि . २२ ( प्रतिनिधी ):- विद्यार्थ्यांनी ग्रामीण भागातील जीवनाचा अनुभव घ्यावा या उद्देशाने इयत्ता पाचवी ते सातवीच्या वर्गातील २८ मुले चार दिवसाच्या निवासी शिबिरात सहभागी झाली. शिबिराची सुरुवात या गावांमध्ये चिपळूण मधून येणारी शेवटची एसटी बस’ चिपळूण माखजन ‘ या बसमधून प्रवासाने झाली.
आंबव येथील सूर्यनारायणाचे मंदिर येथून मंदिरातील १२ सूर्यनमस्काराच्या सामूहिक सेवेने दिनक्रमाची सुरुवात झाली.आंबव मधील सूर्यनारायणाचे मंदिर आणि त्या मंदिराचा इतिहास समजून घेतला . आरवलीतील श्री देव आदित्य नारायण मंदिर या ठिकाणी मंदिराची माहिती मुलांनी घेऊन आंबव आणि आरवली मधील सूर्यनारायण मंदिर यांच्यातील परस्पर संबंध आणि इतिहास समजून घेतला . आरवलीसह राजवाडी येथील गरम पाण्याच्या कुंडांचा अनुभव घेत भौगोलिक आणि वैज्ञानिक दृष्टिकोनातून विचार मुलांनी समजून घेतला.
राजवाडीतील पुरातन सोमेश्वर मंदिर, या मंदिरातील वैशिष्ट्यपूर्ण अंतर्गत रचना मुलांनी समजून घेतली. दुपारच्या सत्रात गोळवलकर गुरुजी ग्रामविकास प्रकल्पाच्या माध्यमातून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे चालू असणारे काम तेथील सौ देशपांडे मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली समजून घेतले.संध्याकाळच्या वेळेत कर्णेश्वर मंदिर आणि त्या परिसरातील आणखी काही मंदिरे आणि येताना छत्रपती संभाजी महाराजांचे स्मारक अशी दोन ऐतिहासिक दृष्ट्या महत्त्वाच्या असणाऱ्या ठिकाणांची माहिती घेतली.
निवासाच्या ठिकाणी वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणाऱ्या काही व्यक्तींचा परिचय विद्यार्थ्यांना व्हावा या उद्देशाने आयोजित केलेल्या सत्रात सौ.मृदुला आदित्य खरे यांनी छोट्या छोट्या दैनंदिन कामकाजातून कलेचा आनंद कसा मिळवावा, कलेचा छंद जोपासल्यामुळे त्याचं मनावरती कसा परिणाम होतो असा चर्चात्मक संवाद करत करत प्रात्यक्षिकातून विद्यार्थ्यांना कापसाच्या फुलवाती पासून आकर्षक रांगोळी कशी करावी असे मार्गदर्शन कृतीसत्रातून केले.
शिबिराच्या तिसऱ्या दिवशी नियोजनानुसार ‘ गड नदी परिक्रमा’ अशा सत्राचे आयोजन केलेले होते यासाठी माखजन इंग्लिश स्कूल मधील शिक्षक सचिन साठे यांनी मुलांना विशेष मार्गदर्शन केले. सरंद गावातील काही शेतकऱ्यांच्या भेटी घेऊन बुरंबाड गावापर्यंत जवळपास दोन ते तीन किलोमीटर चा भाग मुलांनी पायी फिरून समजून घेतला.नदीची रचना, नदीच्या आजूबाजूचा परिसर, नदीच्या परिसरात होणारी काही पिके, इथल्या वातावरणाला अनुसरून घेतली जाणारी पिकं अशा अनेक गोष्टी समजून घेत, झाडांचा परिचय करून घेत मुलांनी आमनेश्वर मंदिराचा इतिहास आणि महत्त्व समजून घेतले .
यानंतर माखजन पंचक्रोशीतील शतकाहून जास्त काळ ज्ञानदानाचे काम करणारे माखजन इंग्लिश स्कूल आणि माखजन पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाचे नव्याने सुरू झालेले काही उपक्रम पाहण्यासाठी शाळा परिसरात पोहोचले. माखजन मधील क्रीडा विभाग, संगीत विभाग भाजीमळा, प्रयोगशाळा, संगणक कक्ष एटीएल लॅब अशा वेगवेगळ्या विभागांचा परिचय करून घेतला .
विद्यार्थ्यांना कोणकोणत्या नद्यांचा संगम येथे होतो याचा प्रत्यक्ष अनुभव आणि दर्शन घडवण्यासाठी विद्यार्थ्यांना छोट्या कालावधीसाठी बोटिंगचा अनुभव देण्यात आला. चिपळूण तालुक्यातून येणारी कापशी नदी ,संगमेश्वर तालुक्यातील गड नदी, संगमेश्वर तालुक्यातूनच येणारी अलकनंदा आणि शास्त्री नदी अशा नद्या आणि हे सगळे तालुके यांना संगमाच्या ठिकाणी असणाऱ्या निसर्गरम्य खाडी परिसरात मुलांनी आनंद घेत माहिती मिळवली. अनेक जणांसाठी बोटिंग च्या प्रवासाचा पहिला अनुभव होता.तिथून भातगाव येथून शिक्षणासाठी दररोज होडी मधून प्रवास करणाऱ्या काही शाळकरी मुलांसोबत चर्चा करताना मुलांना अभ्यासासाठी किती दूरवरचा प्रवास करून मुलं येतात याची जाणीव झाली.
सायंकाळी पंचक्रोशीत नव्याने स्थायिक होऊ पाहणारे पुण्यातील ज्येष्ठ व्हायोलिन वादक विद्याधर शिधये यांनी व्हायोलिन या वाद्याबद्दल,वाद्याच्या रचनेबद्दल वाद्याच्या इतिहासाबद्दल माहिती सांगत सांगत प्रात्यक्षिकातून वाद्याचा परिचय करून दिला. विद्यार्थ्यांनी सांगितलेली काही गाणी शिधये काका यांनी मुलांना वाजवून दाखवली रात्री छोट्या स्वरूपातील विविध गुणदर्शन कार्यक्रम विद्यार्थ्यांनी सादर केला.
शिबिराचा अंतिम आणि चौथा दिवस हा डोंगर चढायचा अनुभवाचा होता माखजन धामापूर मावळंगे परिसरात असणारे नरसिंहाचे मंदिर पहायला पोहचली . जाताना वेगळी वाट येताना वेगळी वाट जातांनाच्या वाटेची वेगळी रचना येतानाच्या वाटेची वेगळी रचना, परतीच्या प्रवासाच्या वेळी मध्यभागी वाटेवरती लागलेला एक खळाळता ओढा, त्या ओढ्याच्या आवाजाने भारलेले वातावरण असं सगळं मुलांना अनुभवता आलं .
शिबिराच्या समारोपात पाचवी ते सातवीच्या प्रत्येक वर्गातील मुलांनी या शिबिरातून काय काय अनुभव घेतले मुलं काय काय शिकली , अशा अनुभवांचे प्रकटीकरण शिबिर समारोपाच्या कार्यक्रमाला विशेष निमंत्रित असणाऱ्या माखजन इंग्लिश स्कूल माखजनच्या मुख्याध्यापिका सौ.रुही पाटणकर आणि माखजन प्रशालेतील विद्यार्थी प्रिय शिक्षक सचिन साठे सर यांच्या उपस्थितीत शिबिर समारोप प्रसंगी विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे आपली मनोगत व्यक्त केली. निवास व भोजन व्यवस्था उपलब्ध करून देणारे संजय साठे,सुयोग साठे आणि कुटुंबीय त्याचबरोबर संपूर्ण शिबिर कालावधीत वाहतूक व्यवस्था उपलब्ध करून देणारे खेरशेत मधील प्रवीण साठे आणि पंचक्रोशीत भेटलेल्या प्रत्येक व्यक्तीसोबत शिबिरातील मुलांचे जिव्हाळ्याचे दृढ संबंध निर्माण झाले.