कळंबुसरे येथे सीसीटीव्ही कॅमेरा यंत्रणेचे लोकार्पण
आधुनिक काळात सुरक्षेची गरज ओळखून सचिन तांडेल मेमोरियल फाउंडेशनचा उपक्रम
उरण (विठ्ठल ममताबादे ) : रायगड जिल्ह्यातील उरण तालुक्यातील सेवाभावी सामाजिक संस्था सचिन तांडेल मेमोरियल फाउंडेशन कळंबुसरे या संस्थेचा ७ वा वर्धापनदिन रविवार दि. १४ जानेवारी २०२४ रोजी साजरा करण्यात आला. यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करून संस्थेचे स्फूर्तिस्थान दिवंगत सचिन तांडेल यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. त्यानंतर वर्धापनदिनचे औचित्य साधून आधुनिक काळाची गरज ओळखून रायगड जिल्हा प्राथमिक शाळा कळंबुसरे आवारात संस्थेमार्फत मान्यवरांच्या हस्ते सीसीटीव्ही कॅमेराचे उदघाटन करण्यात आले.
गेल्या काही वर्षापासुन अनेक समाजोपयोगी उपक्रम संस्थेकडून राबविण्यात आले असून त्यामध्ये प्रामुख्याने रक्तदान शिबीर, शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप,आदिवासी वाडी येथे जिवनावश्यक वस्तू वाटप,वृक्षारोपण आणि त्यांचे संवर्धन, पूरग्रस्तांसाठी थेट मदत,अक्षर भिंत उपक्रम, मोफत आरोग्य तपासणी शिबीर, इको फ्रेंडली मखर स्पर्धा, तरुणांना रोजगार मार्गदर्शन शिबीर, श्रमदान, गतिरोधकांना रंगकाम,ईशाळवाडी दुर्घटना ग्रस्त व्यक्तिंना मदत, विद्यार्थ्यांचा तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांचे उल्लेखनीय कामगिरी बद्दल गुणगौरव, कोरोना महामारीच्या काळात विविध क्षेत्रातील सेवा देणार्या डॉक्टर आणि पोलिस यांचे संस्थेकडून सन्मान करण्यात आले. असे विविध समाजोपयोगी उपक्रम राबविण्यात आले.
या उदघाटन प्रसंगी उपस्थित कळंबुसरे सरपंच उर्मिला नाईक, मुख्याध्यापक ज्ञानेश्वर पाटील यांनी सुंदर शब्दात संस्थेच्या कार्याबद्दल उद्गार काढले तसेच या वेळी उपसरपंच सारीका पाटील, सदस्या सविता नाईक, सदस्य प्रशांत पाटील, समीर पाटील, गजानन गायकवाड, गाव अध्यक्ष महेश पाटील, अँड निनाद नाईक, समाजसेवक प्रकाश पाटील, महेश पाटील,पद्माकर पाटील, रत्नाकर केणी, प्रभूश्वर म्हात्रे, प्रविण पाटील, कैलास पाटील, बळीराम पाटील आदी संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते. संस्थेच्या सर्व सभासदांनी सदर कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडले. अध्यक्ष नंदकुमार तांडेल यांनी उपस्थितांचे आभार मानले.