काँग्रेसचे नेते दादा भाटकर यांचे निधन.
देवरूख : येथील जुन्या काळातील रेशन दुकानचालक व भंडारी समाजाचे नेते विनायक (दादा) शंकर भाटकर यांचे आज दि. १० रोजी दुपारी देवरूख येथील निवासस्थानी वयाच्या ८१व्यावर्षी वृद्धापकाळाने निधन झाले.
दादांचे मूळ गाव संगमेश्वर नावडी. पण गेल्या ५० वर्षाहून अधिक काळ ते देवरूखातच स्थायिक होते. पूर्वीच्या काळात त्यांनी साखरपा-दाभोळ सारख्या अतिदुर्गम व दळणवळणाची साधने नसताहि त्या भागात रेशन दुकान चालवत होते. त्या माध्यमातून त्यांनी गोरगरीबांना मदतीचा हात देत आधार देणेचे काम केले. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांशी समर होत असल्याने त्यांनी तालुक्यात मोठा लोकसंग्रह जमवला होता ते तरूणपणापासून काँग्रेसचे कट्टर कार्यकर्ते होते. त्या काळात त्यांनी शामराव पेजे, मामी भुवड, मुसा मोडक यांच्या खांद्याला खांदा लावून काँग्रेस तळागाळापर्यंत पोहचविण्यासाठी अथक परिश्रम घेतले होते. त्यांनी काँग्रेस पक्षात विविध पदावर काम केले होते. तसेच आपल्या भंडारी समाजाच्या उन्नतीसाठी देखील काम केले..
गेले ६ महिने ते मधूमेहाने आजारी होते.
गेले १५-२० ते अंथरुणाला खिळून होते. आज सकाळी त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्यावर चर्मालय स्मशानभूमी येथे शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्याचे पश्चात दोन मुलगे, सुना, नाववंडे असा परिवार आहे.