महाराष्ट्रराजकीयलोकल न्यूज

गुहागरमधून  विधानसभेसाठी आपण कुणबी समाजाचा उमेदवार देऊ : रामदास कदम

गुहागर : मला गुहागर मतदारसंघातून उभे रहायचे नाही. मात्र, या मतदारसंघात कोट्यवधींची कामे करण्याची जबाबदारी मी घेतली आहे. आपण दोघे मिळून आगामी विधानसभेसाठी या मतदारसंघातून कुणबी समाजाचा उमेदवार देऊ व या समाजाला न्याय देऊ आणि इतिहास घडवू असा सल्ला सभेला उपस्थित असलेल्या डॉ. विनय नातू यांना दिला.
गुहागर तालुक्यातील हेदवी हेदवतड येथील प्रचार सभेत बोलताना केले. यावेळी व्यासपीठावर शिवसेनेचे ज्येष्ठ नेते रामदास कदम, महायुतीचे उमेदवार सुनील तटकरे, माजी आमदार डॉ. विनय नातू, गुहागर राष्ट्रवादी काँग्रेस तालुकाध्यक्ष सुरेश सावंत, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे गुहागर संपर्कप्रमुख प्रमोद गांधी, तालुकाप्रमुख सुनील हळदणकर, मनसे उप जिल्हाध्यक्ष विनोद जानवळकर, भाजपा तालुकाध्यक्ष निलेश सुर्वे, शिंदे गटाचे तालुकाध्यक्ष दीपक कनगुटकर, आनंद भोजने, संतोष जैतापकर, शशिकांत चव्हाण, राजेश बेंडल, दिनेश बागकर, सचिन ओक, रामचंद्र हुमने, शंकर कांगणे, प्रशांत शिरगावकर आदी उपस्थित होते.
यावेळी रामदास कदम यांनी अनंत गीते यांच्यावर जोरदार टीका केली. ते म्हणाले, सुरुवातीला दोनवेळा गीते यांना खासदारकीची उमेदवारी मी मिळवून दिली. तो मुंबईचा पडलेला नगरसेवक होता. त्याला कुणीही विचारत नव्हते, ओळखत नव्हते. बाळासाहेबही ओळखत नव्हते. त्यांच्या दोनवेळच्या निवडणूक उमेदवारीचा खर्च मी केला. त्याला स्वतःचे खेड तालुक्यातील तिसंगी गावही माहित नव्हते. खासदार असूनही स्वतःच्या गावात जाणारा रस्ता करु शकला नाही. त्याच्यात विकास करण्याची धमक नाही. हा तुमचा काय विकास करणार. ज्याला मी उमेदवारी दिली तो माझा होऊ शकला नाही, असे सांगून या निवडणुकीत त्याचे डिपाँझीट जप्त करा, असे आवाहन रामदास कदम यांनी केले. उद्ध्व ठाकरे ५० खोके बोंबलत होते. त्यांनी हे सिद्ध करुन दाखवावे, आम्ही तुमच्याकडे भांडी घासू, अन्यथा तुम्ही आमच्याकडे भांड घासावी असे परखड वक्तव्य कदम यांनी व्यक्त केले.
महायुतीचे उमेदवार सुनील तटकरे यांनी अनंत गीते यांच्यावर टीका करताना सांगितले की, अनंत गीतेंकडे दोनवेळा अवजड उद्योग खाते असताना माझ्या कोकणात किंवा या मतदारसंघात एखादा कारखाना किंवा रोजगार उपलब्ध केला नाही. अनंत गीते स्वतः च्या सावलीला भीत आले म्हणूनच इतक्या वर्षात त्यांनी समाजातील एकाही नेतृत्व उभे केले नाही. माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्याकडे काही काळ अवजड उद्योग खाते असताना त्यांनी रेल्वे बोगीचा कारखाना लातूरमध्ये नेला तर खासदार प्रफुल पटेल यांच्याकडे काही महिने खाते असताना गोंदियामध्ये मोठा कारखाना नेला आणि हजारो लोकांना रोजगार उपलब्ध करून दिला. मात्र या अनंत गीतेंकडे दोनवेळा हेच खाते असताना काही केले नाही.
आठवेळा भाजपसोबत निवडणूका लढलेले अनंत गीते आज त्याच भाजपवर आरोप करत आहेत एवढा कृतघ्न माणूस कुठे पाहिला नाही अशी घणाघाती टीका तटकरे यांनी केली.
अजित पवार यांनी पाच कोटी रुपये देऊन पाया रचला आणि एकनाथ शिंदे यांनी ७ कोटी देऊन कळस ठेवला त्यामुळे समाजोन्नती संघाची वास्तू मुलुंड सारख्या ठिकाणी उभी राहिली. याचा आनंद व्यक्त न करता अतिशय दु:ख झाल्याने त्या वास्तूच्या उद्घाटनालाही अनंत गीते आले नाहीत, ही शोकांतिका आहे अशा शब्दात सुनिल तटकरे यांनी समाचार घेतला. प्रगतशील राज्यात जेवढा विकास झाला त्याचपटीने ईशान्य भागातही पायाभूत सुविधा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उभ्या केल्या आहेत. नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली अयोध्येत राममंदिर उभे राहिले याचा अभिमान आम्हाला आहेच. त्याचबरोबर ते मुस्लिम बांधवांची मशिदही उभी करत आहेत हे मात्र मुस्लिम समाजाला न सांगता निवडणूकीत प्रचाराला मुद्दे नसल्याने समाजासमाजामध्ये दुषित वातावरण निर्माण करुन नरेंद्र मोदींना नाहक बदनाम करु पहात आहेत, असे तटकरे म्हणाले.
डॉ. नातू म्हणाले, अनंत गीते सहावेळा निवडून आले. तसेच ५ वर्षे मोदीजींच्या मंत्रिमंडळात त्यांच्याकडे मंत्रीपद होते. त्यांनी गुहागर परिसरात जहाज उद्योग उभारणीच्या नुसत्या घोषणाच केल्या. या अनुभव सर्व कार्यकर्त्यांना आहे. निवडणुकीच्या सभांमध्ये गीते सर्व लोकांना हात वर करुन मतदान करण्यासाठी शपथ घ्यायला लावायचे. आता आपले उमेदवार सुनील तटकरे यांची काम करण्याची पध्दत आपल्याला माहित आहे. त्यांना एकदिलाने निवडून देऊन आपणाला त्यांच्या माध्यमातून काम करण्याची संधी मिळाली आहे. येथे बसलेले नेते सर्व तालुक्यातील आहेत. प्रत्येक नेता हा जीव ओतून या निवडणुकीत काम करणार आहे. आपण सर्वांनी प्रत्येक मतदारापर्यंत गेलं पाहिजे आणि आपली निशाणी जी घड्याळ आहे ती त्यांच्यापर्यंत पोहोचवावी. हे काम आठ दिवसात आपण पूर्ण करावं आणि सात मे रोजी होणाऱ्या निवडणुकीमध्ये तटकरे यांना बहुमतांनी विजयी करू असा विश्वास डॉ. नातू यांनी व्यक्त केला.

Team RatnagiriLive

कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button