Konkan Railway | नेत्रावती, मत्स्यगंधा एक्सप्रेस महिनाभर पनवेलपर्यंतच धावणार!
![](https://ratnagirilive.in/wp-content/uploads/2024/06/images-2024-06-26T181804.406-640x470.jpeg)
कुर्ला लोकमान्य टिळक टर्मिनस येथील यार्डातील कामासाठी महिनाभर ‘मेगाब्लॉक’
रत्नागिरी : कोकण रेल्वे मार्गे मुंबईतील लो. टिळक टर्मिनसपर्यंत धावणाऱ्या नेत्रावती तसेच मत्स्यगंधा एक्सप्रेसचा प्रवास 30 जूनपासून पुढील महिनाभर एलटीटी ऐवजी पनवेल स्थानकातच संपणार आहे. मुंबईतून डाऊन दिशेला निघताना देखील या गाड्या पनवेल स्थानकातूनच आपला प्रवास सुरू करणार आहेत. लोकमान्य टिळक टर्मिनसच्या यार्डात पिट लाईनच्या देखभाल दुरुस्तीसाठी घेण्यात येणाऱ्या मेगाब्लॉकमुळे हा बदल करण्यात आला आहे.
या संदर्भात कोकण रेल्वेकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार तिरुअनंतपुरम ते लोकमान्य टिळक टर्मिनस दरम्यान रोज धावणारी (16346) नेत्रावती एक्सप्रेस दि. 30 जून ते 30 जुलै 2024 या कालावधीत निर्धारित लोकमान्य टिळक टर्मिनस ऐवजी पनवेल स्थानकातच आपला प्रवास संपवणार आहे. याचबरोबर लोकमान्य टिळक टर्मिनस ते तिरुअनंतपुरम दरम्यान धावणारी दैनंदिन नेत्रावती एक्सप्रेस (16345) ही दिनांक 1 जुलै ते 30 जुलै 2024 अशी संपूर्ण महिनाभर पनवेल येथूनच आपल्या प्रवास सुरू करणार आहे.
या मेगाब्लॉकचा परिणाम होणारी दुसरी गाडी लोकमान्य टिळक टर्मिनस ते मंगळूर सेंट्रल ही मत्स्यगंधा एक्सप्रेस आहे. रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार मंगळूर सेंट्रल ते लोकमान्य टिळक टर्मिनस दरम्यान धावणारी मत्स्यगंधा एक्सप्रेस (12620) दि. 30 जून ते 30 जुलै 2024 या कालावधीत पनवेलपर्यंतच धावणार आहे. तसेच लोकमान्य टिळक टर्मिनस ते मंगळूर सेंट्रल मत्स्यगंधा एक्सप्रेस (12619) ही दि. 1 जुलै ते 30 जुलै 2024 या कालावधीत पनवेल येथूनच मंगळूर सेंट्रलला जाण्यासाठी निघणार आहे.