‘जय श्रीराम’ च्या गजरात श्रीराम दर्शन रथाचे भाजपा प्रदेश कार्यालयात जल्लोषात स्वागत
मुंबई, 16 जानेवारी : अयोध्येतील राम मंदिराची प्रतिकृती असलेल्या श्रीराम दर्शन रथाचे भारतीय जनता पार्टीच्या प्रदेश कार्यालयात मंगळवारी ‘जय श्रीराम’ घोषणांच्या गजरात जोरदार स्वागत करण्यात आले. प्रदेश प्रवक्त्या श्वेता शालिनी, प्रदेश प्रवक्ते अतुल शाह, विनोद वाघ, ओमप्रकाश चौहान, देवांग दवे, कार्यालय सचिव मुकुंद कुलकर्णी, आदि यावेळी उपस्थित होते. अयोध्येच्या राम मंदिरात प्रभू रामचंद्रांच्या भव्यदिव्य प्रतिष्ठापना सोहळ्याचे विधी मंगळवार पासून सुरू झाले आहेत.सर्वांनाच प्रत्यक्ष जाऊन प्रभू रामचंद्रांचे दर्शन घेणे आणि मंदिर पाहता येणे शक्य नाही हे लक्षात घेऊन अयोध्येतील राम मंदिर कसे आहे हे पाहता यावे यासाठी श्वेता शालिनी यांच्या संकल्पनेतून हा श्रीराम दर्शन रथ साकारला आहे. अयोध्येहून आलेल्या कारागीरांनी या रथावर मंदिराची प्रतिकृती उभारली असून प्रभू श्रीरामाची सुंदर मूर्ती ठेवण्यात आली आहे. हा दर्शन रथ महानगरामधील गृहसंकुलांमध्ये जाणार आहे. रथावरील राम मंदिराच्या प्रतिकृतीच्या माध्यमातून अयोध्या येथे येत्या 22 तारखेला लोकार्पण होणा-या मंदिराची माहिती व अयोध्या येथील श्रीरामाच्या दरबाराचे दर्शन घेता येणार आहे.