मुंबई-गोवा हायवेबाधित संगमेश्वर तालुक्यातील टपरीधारकांना मोबदला मिळणार!
आरवली, तुरळ, माभळे, वांद्री या चार गावांमधील वीस जणांना ६४ लाख ७५ हजारहून अधिक भरपाई

रत्नागिरी : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या कामात अनेक गरिब व्यावसायिकांचे व्यवसायाचे खोके, टपर्या उठवण्यात आल्या होत्या. या व्यावसायिकांना नुकसान भरपाई मिळावी, यासाठी मागणी होत होती. या पाठपुराव्याला यश आला असून, पहिल्या टप्प्यात संगमेश्वर तालुक्यातील आरवली, तुरळ, माभळे, वांद्री या चार गावांमधील 20 जणांना 64 लाख 75 हजारहून अधिक रुपयांची नुकसान भरपाई मंजूर झाली आहे. 24 जानेवारीला याचे वितरण मंत्री उदय सामंत यांच्या हस्ते होणार आहे.
छोट्या व्यावसायिकांनी आपल्यालाही मोबदला मिळावा म्हणून राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत, माजी सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांच्यासह आ. किरण सामंत यांच्याकडे विनंती केली होती. यासंदर्भात या छोट्या व्यावसायिकांच्या बैठकाही पार पडल्या होत्या. यामध्ये पहिल्या टप्प्यात संगमेश्वर तालुक्यातील आरवली, तुरळ, माभळे व वांद्री गावच्या हद्दीतील 20 व्यावसायिकांना मोबदला मंजूर झाला आहे.
आरवलीमधील कीर्ती राजेंद्र कुळ्ये, जयवंत बाळकृष्ण कुलकर्णी, प्रज्ञा प्रसाद कुलकर्णी, संतोष जयसिंग अंबोरे, दत्तात्रय विश्राम आंबवकर, तुरळ येथील बाळकृष्ण बाबू बामणे, मनोहर वसंत कुंभार, माभळे येथील दिलीप कृष्णा पेंढारी, प्रकाश बाळ घडशी, विजय यशवंत गिते, अनंत सखाराम वेलणकर, पुरुषोत्तम गुणाजी घडशी, मनोहर सोनू गिते, श्रीकांत टोलू घडशी, संजय अनंत घडशी, मंगेश सोमा सितम तर वांद्री येथील सुशिला गणपत पाखरे, वनिता मधुसूदन वहाळकर, गणपत मृगू खापरे, मनोहर शांताराम रेडीज या वीस जणांना पहिल्या टप्प्यात 64 लाख 75 हजार 992 रुपयांच्या धनादेशाचे वाटप पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते 24 जानेवारी रोजी होणार आहे.