रत्नागिरीतील समुद्रकिनारी भरतीच्या पाण्यात जळगाव, अमरावतीचे दोन विद्यार्थी अडकले
स्थानिक मच्छीमार तसेच पोलिसांनी वाचवला जीव
रत्नागिरी : नजीकच्या भाट्ये बीचवर मंगळवारी सायंकाळी उधाणात भरतीच्या पाण्याचा अंदाज न आल्याने मूळचे जळगाव अमरावतीमधील रहिवासी असले दोन विद्यार्थी अडकून पडले. उधाणाच्या भरतीमुळे वाढणार्या पाण्याचा धोका लक्षात घेऊन स्थानिक मच्छीमार तसेच पोलिसांच्या मदतीने त्यांना पाण्याबाहेर सुखरुप काढण्यात आले. पॉलिटेक्नीकच्या शिक्षणाच्या निमित्ताने हे दोन विद्यार्थी रत्नागिरीत राहत आहेत.
मंगळवारी सायंकाळी पॉलिटेक्निक कॉलेजचा चेतन प्रवीण खडसे (मूळ रा. अमरावती सध्या रा. रत्नगिरी) तसेच त्याची मैत्रीण दीक्षा योगेश सोनगिरे (मूळ रा. जळगाव सध्या रा. रत्नागिरी) ही दोघ फिरण्यासाठी भाट्ये येथील कोहिनूर पॉईंटच्या खालील बाजूला गेले होते. मात्र, तेथून येण्यासाठी त्यांना बाहेर येण्यासाठी वेळ झाला. तसेच आता दिवस लवकर मावळत असल्याने अंधार पडू लागला आणि त्यातच समुद्राला भरती सुरु झाली होती. बघता बघता मोठ-मोठ्या लाटा किनार्यावर आदळू लागल्या. त्यामुळे या दोघांची पाचावर धारण बसली. त्यांनी तातडीने शहर पोलिसांकडे संपर्क साधत मदत मागितली.
पोलिसांनी तातडीने घनास्थळी धाव घेतली परंतु, समुद्राच्या उधाणामुळे त्यांना बाहेर काढण्यात अडचणी निर्माण होत होत्या. दरम्यान, तेथील स्थानिक मच्छिमार बुरहान मजगावकर व सुभान बुड्ये या दोघांनी आपल्या जीवाची बाजी लावत या दोघांना सुखरुप बाहेर काढले.