ब्रेकिंग न्यूजमहाराष्ट्रराजकीय

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस प्रशांत पाटील यांचे आकस्मिक  निधन 

उरण दि २०(विठ्ठल ममताबादे ) : उरण तालुक्यातील भेंडखळ गावचे भूमिपुत्र डॅशिंग नेतृत्व राष्ट्रवादी काँग्रेसचे शरदचंद्र पवार गटाचे प्रदेश सरचिटणीस प्रशांत बाळकृष्ण पाटील (५६ ) यांचे गुरुवार दि २० जुन २०२४ रोजी हृदय विकारच्या झटक्याने त्यांचे आकस्मिक दुःखद निधन झाले असून, उरण पनवेल तालुक्यासह संपूर्ण रायगड जिल्हा नवीमुंबई परिसरातील पदाधिकारी व कार्यकर्त्यामध्ये मोठ्या प्रमाणात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. कोकण पदवीधर मतदार संघातील रायगड जिल्हा महाविकास आघाडीने आयोजित करण्यात आलेल्या उमेदवार रमेश कीर यांच्या प्रचारार्थ पनवेल येथील मेळाव्यात राष्ट्रवादीचे नेते प्रशांत पाटील सुद्धा उपस्थित होते.
या मेळाव्यात अचानकपणे प्रशांत पाटील यांना प्रकृती खालावल्याचे जाणवताच त्यांनी त्यांच्या सहकाऱ्यांसह तात्काळ नवीमुंबई येथील अपोलो रुग्णालयात उपचारासाठी धाव घेतली.उपचार घेत असतांनाच त्यांचा रक्तदाब जोमाने वाढल्याने त्यांना हृदय विकाराचा झटका येऊन त्यांची प्राणज्योत मालवली.
उरण तालुक्यातील प्रकल्पग्रस्तांच्या न्याय हक्कासाठी झालेल्या अनेक आंदोलने,मोर्चाचे ते साक्षीदार आहेत.शिवसेना रायगड जिल्हा प्रमुख पदावर असतांना १९९५ त्यांनी उरण – अलिबाग विधानसभा तर २०१४ मध्ये स्वतंत्र झालेल्या उरण विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढविली होती.
माजी मंत्री गणेश नाईक यांचेही ते निष्ठावंत सहकारी होते.गरीब – गरजूनाही मदत करण्याची त्यांची सवय होती.तरुणांना रोजगार देण्यातही त्यांचा महत्वाचा वाटा होता.राजकारणात मागील ५,६ वर्षांपासून देशाचे नेते शरदचंद्र पवार यांची वाढलेली जवळीक आत्ताच्या घडीला त्यांची जमेची बाजू मानली जात होती.मात्र ईश्वर सत्तेपुढे कोणाचेच चालत नाही.असे उरण तालुक्यातील सर्वांचे प्रशांत भाऊ अखेर अनंतात विलीन झाले.त्यांच्या अंत्ययात्रा सायंकाळी ७:३० वाजता त्यांचे निवासस्थान असलेल्या उरण शहरातील कामठा येथून काढण्यात आली. यावेळी विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी,कार्यकर्ते,यांच्यासह त्याचे नातेवाईक आणि मित्रमंडळीसह, त्यांच्या चाहत्यांनी या अंत्ययात्रेत शोकाकूल वातावरणात मोठी गर्दी केली होती.अंत्यत शोकाकुल वातावरणात उरण बोरी येथील स्मशान भूमीत त्यांच्यावर अंत्य संस्कार करण्यात आले.त्यांच्या पच्छात त्यांची पत्नी,आई,दोन मुलगे आणि भाऊ असा त्यांचा परिवार आहे.

Team RatnagiriLive

कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button