संगमेश्वरजवळील तुरळ येथे कारचा भीषण अपघात; मुंबईतील मनसैनिकाचा मृत्यू
संगमेश्वर (सुरेश सप्रे ) : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या रत्नागिरीत सभेसाठी निघालेल्या मनसैनिकांच्या गाडीला मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर संगमेश्वर तालुक्यातील तुरळजवळ झालेल्या अपघातात बोरिवली येथील देवेंद्र (देवा) जगन्नाथ साळवी (४१) हा मनसेनेचा कार्यकर्ता मृत पावला तर ३जण जखमी झाले.
याबाबत संगमेश्वर पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार मनसे प्रमुख राज ठाकरे यांची आज रत्नागिरीत जाहीर सभा होत आहे. या सभेसाठी राज्यातील विविध भागातून हजारो कार्यकर्ते रत्नागिरीत दाखल झाले आहेत. यापैकीच मुंबई दहीसरयेथून आपल्या ताब्यातील इनोवा कार घेऊन येत असताना तुरळ येथील सद्गुरू सेवा केंद्राजवळ चालक कृषीकेश राणे याचा कारवरील ताबा सुटला आणि अपघात झाला.
अपघातानंतर जखमी अवस्थेत देवेंद्र यांना रुग्णालयात नेत असतांनाच रस्त्यातच त्यांची प्राणज्योत मालवली. गाडीतील सौ. चेतना हर्षल सावंत, प्रकाश मोरे, कृषीकेश राणे हे सहप्रवासी किरकोळ जखमी झाले. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
देवेंद्र साळवी हा मुंबई – बोरीवलीतील मनसेचा सक्रिय कार्यकर्ता होता. त्याच्या निधनाची बातमी समजताच मनसे नेते नितीन सरदेसाई, बाळा नांदगावकर आदीनी रुग्णालयात धाव घेतली. त्यांच्या निधनामुळे मनसैनिकात शोककळा पसरली आहे