ब्रेकिंग न्यूजमहाराष्ट्ररत्नागिरी अपडेट्सलोकल न्यूज
रत्नागिरी तालुक्यात खानू येथे बिबट्याच्या हल्ल्यात एक गंभीर जखमी
![](https://ratnagirilive.in/wp-content/uploads/2024/01/khanu-780x470.jpg)
नाणीज, दि. ७ : रत्नागिरी तालुक्यातील मौजे खानू येथे काल शनिवारी बिबट्याने केलेल्या हल्ल्यात मनोहर अर्जुन सुवारे (वय ७०) गंभीर जखमी झाले आहेत. त्यामुळे परिसरात घबराटीचे वातावरण आहे.
मौजे खानू येथे काल सायंकाळी ६.३० च्या दरम्यान ही घटना घडली. श्री सुवारे यावेळी बाजार करून येथील श्री. महेश सनगर यांचे घरापासून सुमारे १०० मीटर अंतरावर असलेल्या गोवंडेवाडीकडे जाणाऱ्या पाय वाटेने घरी चालले होते. त्यावेळी बिबट्याने केलेल्या हल्ल्यात श्री सुवारे हे जखमी झाले. त्यांच्या डाव्या व उजव्या कानाच्या वरच्या दोन्ही बाजूस व डाव्या गालावर जखमा झालेल्या आहेत.
जोरात ओरडा ओरड झाल्यावर जवळच घर असलेले महेश सनगर हे त्या ठिकाणी दाखल झाले त्यावेळी बिबट्या यांच्यावर हल्ला करत होता. जोरात आवाज दिल्यावर बिबट्याने आपल्या पिल्लासह तेथून पळ काढला रक्त बंबाळ अवस्थेत त्यांच्यावर पाली येथील शासकीय ग्रामीण रुग्णालयात प्रथमोपचार केले. नंतर पुढील उपचारासाठी रत्नागिरी येथील शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले आहे. तिथे त्यांच्यावर उपचार चालू आहेत.
या घटनेची माहिती पाली ता. रत्नागिरी येथील युवा सामाजिक कार्यकर्ते श्री सौरभ खाके यांनी पाली वनपाल यांना भ्रमणध्वनीवरून दिली. त्यानंतर वन अधिकारी यांनी जखमी श्री मनोहर सुवारे यांची रुग्णालयात भेट घेतली. उपचारा बाबतीत माहिती घेतली आहे.
संध्या महामार्गाचे काम सुरु असल्याने आसपासचा जंगल परिसर उजाड होतोय. प्राण्यांचे निवारे व पाणवठे कमी होत आहेत. अशा परिस्थितीत वाघ, बिबट्या अशा जंगली जनावरांचा मनुष्य वस्तीत वावर वाढतोय.
इथली बरीचशी लोकवस्ती शेतीवर मोलमजुरी करणारी आहे. सकाळी उठून कामावर गेले नाही तर चूल पेटण्याची भ्रांत त्यांना असते. या प्राण्यांच्या दहशतीमुळे हातावर पोट असणाऱ्या शेतमजूर कष्टकऱ्यांचे जीवन अजूनच कष्टप्रद झालय. बिबट्याला प्रत्यक्ष पाहणारे येथे अनेकजण आहेत. एक वर्षापासून येथे वाघाची, बिबट्याची दहशत आहे. मादी बिबट्या तीन लहान पिलासह फिरताना अनेकांनी पाहिले आहे. यापूर्वी नविवाडी येथील ग्रामस्थांवरही वाघाने केला होता. त्यामुळे परिसरात वन्य प्राण्यांची दहशत आहे. त्यामळे घबराट आहे.
घटनास्थळी पाली कार्यक्षेत्राचे वनपाल गावडे, वनरक्षक मिताली कुबल, अधिक तपास करत आहेत, तसेच ग्रामस्थ माजी सरपंच गणेश सुमारे, दिनेश चाळके, शिवसेना विभाग संघटक संजय सोलकर, काशिनाथ घाणेकर, अनंत सनगर घटनास्थळी दाखल झाले.
![](https://ratnagirilive.in/wp-content/uploads/2024/01/img-20240107-wa00435322242330880943120.jpg)