उरणमध्ये महिलांसाठी अन्नप्रक्रिया प्रशिक्षण
एम.डी.आर. सी. मार्फत श्री समर्थ कृपा सखी संस्था उरण येथील प्रशिक्षणाची सांगता
उरण, (विठ्ठल ममताबादे ) : महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र यांच्यामार्फत श्री समर्थ कृपा सखी संस्था उरण येथे एक महिन्याचे महिलांसाठी फूड प्रोसेसिंग व बॅग मेकिंग चे प्रशिक्षण मोफत देण्यात आले. श्री समर्थ कृपा सखी संस्थेच्या अध्यक्षा संगीता सचिन ढेरे या सेवाभावी वृत्तीने कार्य करत असतात.त्यांचा नेहमी प्रयत्न महिला सक्षमीकरण करण्यासाठीचा असतो .महिलांना स्वावलंबी बनविण्यासाठी बॅग मेकिंग व फूड प्रोसेसिंग या महिनाभराच्या प्रशिक्षणाचा समारोप करण्यात आला.
या समारोपाच्या कार्यक्रमात श्री समर्थ कृपा सखी स्वयंसहाय्यता संस्था, यशोलक्ष सामाजिक संस्था व आधार सामाजिक संस्था या तिन्ही संस्थांच्या संयुक्त विद्यमानाने महिलांसाठी मासिक पाळीविषयीचे समाजात असलेल्या अंधश्रद्धा दूर कशी दुर होईल या विषयावरील व्याख्यान डॉ.दीपक खाडे व शैला खाडे यांनी दिले. तसेच रत्नप्रभा बेल्हेकर यांनी महिलांना स्वबळावर उद्योजक कसे बनावे या विषयावर महिलांना मार्गदर्शन केले . रायगड भूषण राजू मुंबईकर यांनी देखील महिलांनी कोणताही न्युनगंड न बाळगता व्यवसाय कसा करावा याबाबत महिलांना मार्गदर्शन केले.
यानंतर महिलांना करमणुकीसाठी सौंदर्यवती स्पर्धा, व खेळ पैठणीचा या स्पर्धा घेण्यात आले.महिलांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला. उरणच्या माजी नगराध्यक्ष सायली म्हात्रे तसेच मनसे जिल्हाध्यक्ष संदेश भाई ठाकूर मिटकॉन चे प्रसाद मांडेलकर्,प्रशिक्षक म्हणून लाभलेल्या श्वेता चींगळे यांच्या हस्ते बक्षीस वितरण समारंभ करण्यात आले. मिटकॉन चे प्रसाद मांडेलकर व पीएम इंटरप्राईजेस चे योगेश म्हात्रे यांनी विजेत्यांना बक्षीस स्वरूपात भेट देऊन या कार्यक्रमात विशेष योगदान दिले.
कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी संगीता ढेरे ,अभया म्हात्रे, अश्विनी धोत्रे ,कविता म्हात्रे, मंजू कुमार, प्रियंका पाटील ,मयुरी खाडे ,पूजा नायक, मीनाक्षी कोळी यांनी मेहनत घेतली .श्री समर्थ कृपा सखी स्वयंसहाय्यता संस्थेच्या अध्यक्षा संगीता सचिन ढेरे यांनी आभारप्रदर्शन करून कार्यक्रमाची सुंदर सांगता केली .