गागोदे बुद्रुक येथे विनोबा भावे यांच्या स्मरणार्थ महेंद्रशेठ घरत उभारणार स्वागत कमान !

- काँग्रेसचे रायगड जिल्हाध्यक्ष महेंद्रशेठ घरत यांचे विनोबा भावे यांना अभिवादन!
उरण दि ११ (विठ्ठल ममताबादे ) : भूदान चळवळीचे प्रणेते आणि भूदान चळवळीद्वारे भूमिहीनांना जमिनी देणारे, ‘भारतरत्न’ विनोबा भावे यांची जयंती गुरुवारी (ता. ११) पेण येथील त्यांच्या जन्मगावी
गागोदे बुद्रुक येथे साजरी करण्यात आली. यावेळी कॉंग्रेसचे रायगड जिल्हाध्यक्ष महेंद्रशेठ घरत यांनी विनोबा भावे यांना अभिवादन केले.

यावेळी महेंद्रशेठ घरत म्हणाले, ”विनोबा भावे महान होते. त्यांनी जगाला आदर्शवत अशी भूदान चळवळ राबवली. ज्यांना जमिनी नाहीत त्यांना विनोबा भावे यांनी सावकारांकडून जमिनी घेऊन त्या भूमिहीनांना दान केल्या. त्यांची ही भूमिका जगावेगळी आहे. विनोबा भावे आणि कर्मवीर भाऊराव पाटील यांचा आदर्श मी घेतला. आपल्या ताटातील अर्धी भाकरी दुसऱ्याला देण्याचा. त्यामुळेच स्वत:च्या कमाईतील ४० टक्के कमाई गोरगरिबांवर मी खर्च करतोय. अनेक विद्यार्थ्यांना दत्तक घेऊन शिक्षण आणि नोकरीही दिली. गरिबांच्या घरांना मदत, अनेकांना घरे, गाड्या दिल्यात. हीच दातृत्वाची भावना घेऊन यापुढेही असेच आयुष्य जगणार आहे. “
“गरिबीमुळेच मी राजकारणात आलो. त्यामुळे महिलांच्या डोक्यावरील हंडा उतरवला. शेलघर हे आदर्श गाव बनवले. काम करण्याचा उद्देश चांगला असेल तर निश्चितच यश मिळते. ‘जनसेवेसी काया झिजवावी’, या उक्तीप्रमाणे सामाजिक संस्थांच्या मी कायम मागे आहे. विनोबांच्या स्मृती कायम राहण्यासाठी त्यांच्या नावाने स्वागत कमान उभारली जाईल. खर्चाची जबाबदारी मी घेतो,” असे आंतरराष्ट्रीय कामगार नेते महेंद्रशेठ घरत यावेळी म्हणाले.
यावेळी सर्वोदय चळवळीचे ज्येष्ठ नेते बापूसाहेब नेने, शिवाजीदादा कागणीकर, डॉ. श्रीराम जाधव आदी मान्यवर उपस्थित होते.
महाराष्ट्र प्रदेश काॅंग्रेसचे सरचिटणीस मिलिंद पाडगावकर, श्रद्धा ठाकूर, वैभव पाटील, मार्तंड नाखवा आणि सर्वोदय चळवळीचे कार्यकर्तेही मोठ्या संख्येने उपस्थित होते.