संगमेश्वरच्या पैसा फंड प्रशालेत व्यक्ती चित्राचे प्रात्यक्षिक
- डी-कॅडच्या प्राध्यापकांची उपस्थिती
- कला क्षेत्रातील संधी विषयी मार्गदर्शन
संगमेश्वर : व्यापारी पैसा फंड संस्था संगमेश्वर संचलित पैसा फंड इंग्लिश स्कूलच्या कला विभागात देवरुख कॉलेज ऑफ आर्ट अँड डिझाईनतर्फे इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांना व्यक्तिचित्राचे प्रात्यक्षिक प्रा. अवधूत पोटफोडे यांनी दाखविले. व्यक्तिचित्र रेखाटताना कोणकोणत्या बाबींचा अभ्यास करणे महत्त्वाचे असते, याविषयीची अधिक माहिती अवधूत पोटफोडे यांनी याप्रसंगी दिली.
पैसा फंडच्या कला विभागातर्फे प्रा. सुयोग पेंढारकर , प्रा. अवधूत पोटफोडे यांचे स्वागत करण्यात आले. पेंढारकर यांनी दहावी आणि बारावीनंतर कलाक्षेत्रात कोणकोणत्या संधी उपलब्ध आहेत याविषयी अधिक माहिती दिली. कलेमध्ये आपल्या आवडीनुसार विषय निवडण्याची संधी उपलब्ध असल्याने विद्यार्थ्यांना या क्षेत्रात करियर करणे, सहज शक्य आणि सोपे झाले असल्याचे पेंढारकर यांनी सांगितले. डी कॅड मध्ये कलाविषयक विविध उपक्रम राबविले जात असून ते पाहण्यासाठी विद्यार्थ्यांनी जरूर यावे, असे आवाहनही पेंढारकर यांनी यावेळी केले.
डिकॅडचे प्राचार्य रणजीत मराठे यांनी संगमेश्वर तालुक्यातील विविध माध्यमिक शाळांमध्ये जाऊन दहावी आणि बारावी मध्ये शिकत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी कला शिक्षणाच्या असलेल्या संधी याविषयी प्राध्यापकांच्या माध्यमातून मार्गदर्शन करण्याचा उपक्रम हाती घेतला आहे. याचाच एक भाग म्हणून आज पैसा फंड इंग्लिश स्कूलमध्ये ही कार्यशाळा संपन्न झाली. प्रा. अवधूत पोटफोडे यांनी केवळ ४५ मिनिटात व्यक्ती चित्राचे जलरंगात प्रात्यक्षिक दाखवले. व्यक्तिचित्र काढत असताना प्रमाण, रचना, छायाप्रकाश, शरीरशास्त्र यांचा अभ्यास महत्त्वाचा असतो. पोटफोडे यांनी दाखविलेले प्रात्यक्षिक पाहून उपस्थित विद्यार्थी भारावून गेले. विद्यार्थ्यांनी उपस्थित केलेल्या शंकांचे पेंढारकर आणि पोटफोडे यांनी निरसन केले.
व्यापारी पैसा फंड संस्थेचे सचिव धनंजय शेट्ये यांनी डी कॅडने प्रशालेत आयोजित केलेल्या कलाविषयक कार्यशाळेबद्दल प्राचार्य रणजीत मराठे, प्रा. अवधूत पोटफोडे, प्रा. सुयोग पेंढारकर यांना धन्यवाद दिले. प्रशालेचे मुख्याध्यापक सचिन देव खामकर यांनीही या उपक्रमाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.