सह्याद्रि स्कूल ऑफ आर्टच्या स्वराज कदमच्या ‘नवगुंजा’ शिल्पाची निवड

- आर्ट सोसायटी ऑफ इंडिया’ची स्पर्धा
संगमेश्वर : आर्ट सोसायटी ऑफ इंडिया मुंबई या संस्थे तर्फे घेण्यात येणाऱ्या १०७ व्या ऑल इंडिया आर्ट स्पर्धेत सह्याद्री स्कूल ऑफ आर्टच्या स्वराज कदम याने बाजी मारली आहे. राज्य कला प्रदर्शनात सह्याद्री कला महाविद्यालयाच्या २५ विद्यार्थ्यांच्या चित्रं आणि शिल्पाची निवड झालेली असताना तसेच विशाल गोवळकर याच्या शिल्पाला राज्यात प्रथम क्रमांक प्राप्त झालेला असतानाच आता स्वराज कदम याने आर्ट सोसायटीच्या प्रदर्शनात अभिनंदनीय यश प्राप्त करुन सह्याद्रीच्या यशात मानाचा तुरा खोवला आहे.
स्वराज कदम हा सह्याद्रि स्कूल ऑफ आर्ट या चित्र शिल्प कलामहाविद्यालयात शिल्पकला वर्गात शिकत असून त्याने केलेल्या “नवगुंजार “या शिल्पाची निवड झाली आहे.या स्पर्धेत निवड होणे हे विद्यार्थी कलाकार म्हणून खुप महत्वाचे मानले जाते.या वर्षी हे प्रदर्शन मुंबई येथील प्रसिद्ध जहांगीर कलादालनात दि.१८ फेब्रुवारी २०२५ ते २४ फेब्रुवारी २०२५ या दरम्यान होणार आहे.
शिल्प निर्मितीचा आनंद अवर्णनीय !
शिल्प निर्मिती करताना माझ्या मनात विविध विचारांचे काहूर होते. हे सर्व विचार एकत्र करुन केलेली शिल्प निर्मिती म्हणजे ” नवंगुंजार ” होय. कलाकृती साकारत असताना कलाकार कधीही पारितोषिकाचा विचार करत नाही. आपलं अंतर्मन जागृत केल्यानंतर हातातून जे साकारते, ते प्रथम आपल्याला समाधान आणि आनंद देणारं असेल, तर नक्कीच ती कलाकृती कलारासिकांना भावते आणि आनंद देते हा आपला अनुभव आहे. नवंगुंजार या शिल्पालाची आर्ट सोसायटी ऑफ इंडियाच्या प्रदर्शनात निवड होईल असं वाटलं नव्हतं. यासाठी आपल्याला प्राचार्य माणिक यादव आणि शिल्पकलेचे प्राध्यापक रुपेश सुर्वे यांचे मार्गदर्शन लाभले.
– स्वराज कदम.
या यशस्वी विद्यार्थ्याचे सह्याद्री शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष व आमदार शेखर निकम, संस्थेचे अध्यक्ष बाबासाहेब भुवड, सचिव महेश महाडिक, ज्येष्ठ चित्रकार शिल्पकार प्रा. प्रकाश अर्जुन राजेशिर्के, पूजा निकम, कला महाविद्यालयाचे प्राचार्य माणिक यादव, प्रा. रुपेश सुर्वे तसेच सर्व प्राध्यापक यांनी या विद्यार्थ्यांचे कौतुक केले आहे.