अमेरिकेत बाप्पाच्या मस्तकी झळकणार रत्नागिरीच्या बनेंचा फेटा
रत्नागिरी : लाडका गणपती बाप्पा खुलून दिसावा म्हणून हल्ली त्याच्या डोक्यावर खराखुरा फेटा बांधला जातो. रत्नागिरीत फेटे बांधणीसाठी प्रसिद्ध असणाऱ्या महेश बने यांच्या ऍडजस्ट होणाऱ्या फेट्याला यावर्षी थेट अमेरिकेतून मागणी आली असून तिथल्या सावंत कुटुंबातील बाप्पाच्या डोईवर हा फेटा सजणार आहे.
रत्नागिरीतील कर्ला या गावात राहून फेटे बांधणीचा आपला छंद जोपासणाऱ्या महेश बने यांनी आपल्या कामात नेहेमीच वैविध्य ठेवलं. त्यांनी पुढे जाऊन गेली काही वर्ष गणपतीला फेटे बांधून देण्याचं काम सुरू केलं. मूर्तीच्या मापानुसार हे फेटे बांधले जात. आता त्या ही पुढे जाऊन या फेट्यात अधिक सुलभता आणत त्यांनी ऍडजस्ट होणारे फेटे तयार केले असून रत्नागिरी आणि आजूबाजूच्या परिसरात प्रसिद्ध असलेला हा फेटा आता थेट अमेरिकेत पोचला आहे. अमेरिकेतील मिशिगन इथे राहणाऱ्या नेहा सावंत कुर्डे यांना
सोशल मीडियावरून बने यांच्या फेट्याची माहिती मिळाल्यावर सावंत कुटुंबाने या फेट्याची मागणी केली आहे. गणेश चतुर्थीला त्यांचा घरातील बाप्पाच रूप बनेंच्या फेट्यामुळे यावर्षी अधिकच खुलणार आहे.
महेश गेली पंचवीस वर्ष हा व्यवसाय करत असून फेटे बांधणी बरोबरच आता गणपती, कृष्ण, ज्योतिबा इत्यादी मूर्त्याना ते धोतर,पोशाख किंवा अंगरखा ही घालून देतात. विशेष म्हणजे अलीकडेच त्यांनी आगवे गावाच्या पलखीलाही फेटा बांधून दिला.
महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांबरोबरच महेश बने यांचे फेटे गोवा कर्नाटक राज्यातील लोकांनाही आवडत असून त्यांच्याकडूनही मागणी होत असते. भविष्यात भक्तांसाठी संपूर्ण पोषाखासहित मूर्ती तयार करून ते देणार आहेत.