एकाही उपाकरणाशिवाय दोन तासात साकारली शिल्पाकृती
शिल्पकार मधुकर वंजारी यांची थक्क करणारी शिल्पकला
संगमेश्वर : शाडूच्या मातीमध्ये काम करीत असताना आपण माणसाच्या चेहऱ्याचे शिल्प साकारत असाल तर प्रथम त्या चेहऱ्याचा बारकाईने अभ्यास करणे आवश्यक असते. प्रत्येक कलाकाराचे तंत्र आणि शैली वेगवेगळी असली तरी शिल्पात जीवंतपणा आणणे हेच कलाकाराचे खरे कसब असते. गेली ३५ वर्षे आपण शिल्पकार म्हणून काम करत आहोत. सरावाने निर्माण झालेल्या आत्मविश्वासामुळेच आज आपण मातीकाम करताना एकाही उपकरणाचा वापर केला नाही . शिल्पकला शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनी स्वतःमधील आत्मविश्वास दृढ करा, असे प्रतिपादन ज्येष्ठ शिल्पकार मधुकर वंजारी यांनी सह्याद्री कला महाविद्यालय सावर्डे येथे मातीकामाच्या प्रात्यक्षिका दरम्यान कला विद्यार्थ्यांजवळ संवाद साधताना केले.
सह्याद्री कला महाविद्यालय सावर्डे ता . चिपळूण येथे २९ वे वार्षिक कला प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे . या कला प्रदर्शनातील दुपारच्या सत्रात ज. जी. कला महाविद्यालय मुंबईचे माजी प्राध्यापक आणि ज्येष्ठ शिल्पकार मधुकर वंजारी यांचे ‘ हेड स्टडी ‘ या विषयावर प्रात्यक्षिक आयोजित करण्यात आले होते. सह्याद्री कला महाविद्यालयाचे प्राचार्य माणिक यादव यांनी शिल्पकार वंजारी आणि ललित कला महाविद्यालय चोपडाचे प्राचार्य राजेंद्र महाजन यांची कला विद्यार्थ्यांना ओळख करुन दिली . यावेळी ज्येष्ठ शिल्पकार – चित्रकार प्रकाश राजेशिर्के, प्रा . देडगे , निसर्ग चित्रकार विष्णू परीट , शिल्पकार प्रा . रुपेश सुर्वे, प्रा. अवधूत खातू , प्रा . विक्रांत बोथरे आदी मान्यवर उपस्थित होते.
शाडूच्या मातीमध्ये हेडस्टडीचे प्रात्यक्षिक दाखविताना मॉडेल म्हणून ललित कला महाविद्यालय चोपडाचे प्राचार्य राजेंद्र महाजन हे बसले होते . शाडूच्या मातीचा पहिला गोळा हातात घेतल्यापासून केवळ एक तास आणि ४५ मिनीटांमध्ये शिल्पकार वंजारी यांनी महाजन यांचे हुबेहूब शिल्प साकारले . शिल्पकार वंजारी यांचे खास वैशिष्ट्य म्हणजे त्यांनी शिल्प साकारताना एकाही उपकरणाचा वापर केला नाही . हातांची बोटे , तळवा यांचा वापर करुन त्यांनी महाजन यांचा चेहरा जसाच्या तसा साकारला . शिल्पकार वंजारी यांच्या अनुभवामुळे त्यांचा कामातील वेग, चेहऱ्यावरील टिपलेले सर्व बारकावे याबरोबरच त्यांच्यातील साधेपणा खूप काही सांगून गेला.
प्रात्यक्षिक पूर्ण होताच विद्यार्थ्यांनी टाळ्यांचा कडकडाट करुन शिल्पकार मधुकर वंजारी यांना मानवंदना दिली. यावेळी विद्यार्थ्यांनी उपस्थित केलेल्या शंकाचेही त्यांनी निरसन केले. ज्येष्ठ चित्रकार शिल्पकार प्रकाश राजेशिर्के यांनी शिल्पकार मधुकर वंजारी यांच्या शिल्पकामाची प्रशंसा करुन सह्याद्री कला महाविद्यालयात येवून त्यांनी शिल्प कलेच्या विद्यार्थ्यांना जे अनमोल असे मार्गदर्शन केले त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.