महाराष्ट्ररत्नागिरी अपडेट्सलोकल न्यूजसाहित्य-कला-संस्कृती

ओझरमधील मंदिर-संस्कृती रक्षणार्थ ‘महाराष्ट्र मंदिर न्यास परिषदे’त रत्नागिरी जिल्ह्यातील २३ मंदिरांचे विश्वस्त व सदस्य होणार सहभागी


रत्नागिरी, ३० नोव्हेंबर : मंदिरे ही हिंदु धर्माची आधारशीला आहेत. त्यातून मिळणार्‍या ईश्वरी चैतन्यामुळेच आधुनिक काळातही समाज मंदिरांकडे आकर्षित होतो. त्यामुळे मंदिरांतील पावित्र्याचे रक्षण करणे, हे हिंदु समाजाचे दायित्व आहे. मंदिरातील देवतातत्त्व टिकवण्यासाठी मंदिरांत विधीवत पूजा-अर्चा करणे, प्राचीन मंदिर-संस्कृतीचे संवर्धन करणे, मंदिरांच्या समस्यांचे निवारण करणे, मंदिरात येणार्‍या भाविकांसाठी सुविधा उपलब्ध करून देणे, दर्शनरांगांचे सुनियोजन करणे, तसेच मंदिर परंपरांचे रक्षण करणे यांसाठी मंदिरांचे विश्वस्त, पुजारी, भक्त आदींचे संघटन आवश्यक आहे. त्यासाठी श्री विघ्नहर गणपति मंदिर देवस्थान, लेण्याद्री गणपती मंदिर देवस्थान, श्री क्षेत्र भीमाशंकर देवस्थान, हिंदु जनजागृती समिती आणि महाराष्ट्र मंदिर महासंघ यांच्या संयुक्त विद्यमाने २ आणि ३ डिसेंबर २०२३ यादिवशी श्री विघ्नहर सभागृह, ओझर, जिल्हा पुणे येथे द्वितीय ‘महाराष्ट्र मंदिर न्यास परिषदे’चे आयोजन करण्यात आले आहे.

या परिषदेला संपूर्ण महाराष्ट्रातून ५५० हून अधिक निमंत्रित मंदिरांचे विश्वस्त, प्रतिनिधी, पुरोहित, मंदिरांच्या रक्षणासाठी लढा देणारे अधिवक्ते, अभ्यासक आदी सहभागी होणार आहेत. या परिषदेमध्ये रत्नागिरी जिल्ह्यातील २३ मंदिरांचे ३६ विश्वस्त आणि सदस्य सहभागी होणार आहेत, अशी माहिती ‘महाराष्ट्र मंदिर महासंघा’चे श्री. संजय जोशी यांनी पत्रकार परिषदेत दिली.


या वेळी श्री. जोशी पुढे म्हणाले, ‘‘जळगाव येथे पहिल्या ‘महाराष्ट्र मंदिर न्यास परिषदे’त ‘महाराष्ट्र मंदिर महासंघा’ची स्थापना करण्यात आली होती. त्यानंतर महासंघाचे कार्य उत्तरोत्तर वाढत असून केवळ ४ महिन्यांमध्ये ते संपूर्ण राज्यभर पोचले आहे. महाराष्ट्र मंदिर महासंघाच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्यात केवळ ९ महिन्यांत २४० मंदिरांमध्ये वस्त्रसंहिता लागू करण्यात आली आणि दिवसेंदिवस त्यात वाढ होत आहे.


या मंदिर परिषदेला ‘हिंदु फ्रंट फॉर जस्टिस’चे प्रवक्ते आणि सर्वाेच्च न्यायालयाचे अधिवक्ता विष्णुशंकर जैन, ‘झी’ 24 तास या वृत्तवाहिनीचे संपादक श्री. नीलेश खरे, यांसह श्री अष्टविनायक मंदिरांचे विश्वस्त, महाराष्ट्रातील जोतिर्लिंग देवस्थानांचे विश्वस्त, संत पिठांचे प्रतिनिधी, यासह देहूचे संत तुकाराम महाराज मंदिर, पैठणचे नाथ मंदिर, गोंदवले येथील श्रीराम मंदिर, अंमळनेर येथील मंगळग्रह मंदिर आदी मंदिरांचे विश्वस्त, याशिवाय रत्नागिरी जिल्ह्यातील संस्थान श्री देव गणपतीपुळे, श्री महाकाली मंदिर, आडिवरे, ता. राजापूर, श्री कनकादित्य मंदिर, कशेळी, ता. राजापूर, श्री स्वयंभू काशीविश्वेश्वर देवस्थान, राजिवडा, रत्नागिरी, संस्थान श्री भार्गवराम परशुराम देवस्थान, चिपळूण, श्री रामवरदायिनी मंदिर देवस्थान ट्रस्ट, मजरे-दादर, ता. चिपळूण, खेड तालुका वारकरी भाविक संप्रदाय मठ, भरणे, ता. खेड, श्री दुर्गादेवी देवस्थान, मुरुड, ता. दापोली आदी प्रसिद्ध मंदिरांचे विश्वस्त आणि सदस्य, तसेच सनातन संस्थेचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. चेतन राजहंस, हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. रमेश शिंदे आदी मान्यवर सहभागी होणार आहेत.

या मंदिर परिषदेत मान्यवरांचे मार्गदर्शन, मंदिरांशी निगडीत विविध विषयांवर चर्चासत्रे होणार आहेत. यामध्ये ‘मंदिरे सनातन धर्मप्रचाराची केंद्रे बनवणे’, ‘मंदिरे सरकारीकरण मुक्त करणे’, ‘वक्फ कायद्या’द्वारे मंदिरांच्या भूमीवर अतिक्रमण आणि मंदिरे बळकावणे यांवर उपाय, मंदिरे आणि तीर्थक्षेत्रे यांच्या परिसरात मद्य-मांस बंदी; दुर्लक्षित मंदिरांचा जीर्णाेद्धार आदी विषयांवर चर्चा होणार आहे. ही मंदिर परिषद केवळ निमंत्रितांसाठी असून यामध्ये सहभागी होण्यासाठी 7020383264 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन मंदिर महासंघाने केले आहे.

Team RatnagiriLive

कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button