कोकणातील कृषी उत्पादने परदेशात न्यायला मदत करणार : रवींद्र प्रभुदेसाई
![](https://ratnagirilive.in/wp-content/uploads/2025/02/IMG-20250206-WA0021-780x470.jpg)
रत्नागिरी : कोकणात तयार झालेली कृषी प्रक्रियायुक्त उत्पादने जगाच्या बाजारपेठेत नेण्यासाठी पितांबरी उद्योग समूह मदत करील अशी ग्वाही पितांबरीचे व्यवस्थापकीय संचालक रवींद्र प्रभुदेसाई यांनी दिली.
राजापूर लांजा तालुका नागरिक संघातर्फे वाटूळ (ता. राजापूर) येथे झालेल्या दहाव्या ग्रामीण साहित्य संमेलनात ते बोलत होते. या संमेलनात त्यांना संघाचा पहिला कोकणभूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. पुरस्काराबद्दल श्री. प्रभुदेसाई यांनी कृतज्ञता व्यक्त केली. ते म्हणाले, देव, देश आणि धर्म यांना प्राधान्य देऊन पितांबरीची वाटचाल सुरू आहे. कोकणात काहीतरी करण्याची धडपड असलेल्या या राजापूर लांजा तालुका नागरिका संघाला मी सदैव मदत करणार आहे. जवळच करक येथे धरण झाले आहे. त्यातून आलेली समृद्धी आपण लक्षात घेतली पाहिजे. त्यासाठी पितांबरीतर्फे विविध प्रयोग राबविले जात आहेत. उसाची लागवड केली आहे. रुचियाना गूळ तयार करण्यात आला आहे. मधाचे गावही आणि तळवडे येथे आम्ही तयार करत आहोत. याच पद्धतीने धरणाच्या पाण्याचा उपयोग करून घेऊन कोकणाला पुढे नेता आले पाहिजे. केवळ कमॉडिटीच्या वस्तू नव्हे, तर कोकणाचा अनमोल ठेवा उत्पादनांच्या रूपाने जगभरात नेला पाहिजे. जगाच्या बाजारपेठेत ही उत्पादने नेण्यासाठी पितांबरी सदैव मदत करील. अनेक फार्मर प्रोड्युसर कंपन्या निर्माण व्हायला हव्यात. त्यांनी तयार केलेली उत्पादने जगाच्या बाजारपेठेत जाऊ शकतात. कोकणाच्या अशा विकासासाठी पितांपरी कटिबद्ध आहे, अशी ग्वाही श्री. प्रभुदेसाई यांनी दिली.
समारंभात दिले गेलेले अन्य पुरस्कार असे – जीवन गौरव पुरस्कार – ज्ञानदेव दळवी, येरडव, ता. राजापूर. रघुनाथ सदाशिव तथा तात्या गुणे, वेरळ, ता. लांजा. साने गुरुजी पुरस्कार – श्रीमती मनीषा गवाणकर, जि. प. शाळा शेढे नं. १ (ता. राजापूर). श्रीमती विभा विकास बाणे जि. प. शाळा तोणदे, रत्नागिरी. प्रा. मधु दंडवते पुरस्कार – आर. के. व्हनमाने, नवजीवन विद्यालय आणि कनिष्ठ महाविद्यालय, राजापूर. सौ. रश्मी रा. धालवलकर, रुक्मिणी भास्कर विद्यालय, व्हेळ, ता. लांजा. बॅ. नाथ पै पुरस्कार – युयुत्सु आर्ते, देवरूख. युवराज हांदे, रिंगणे. ता. लांजा. बळीराजा पुरस्कार – दयानंद चौगुले, खरवते, ता. राजापूर. जीवन माळी, लांजा. अक्षररत्न पुरस्कार – जे. डी. पराडकर, संगमेश्वर, प्रा. सुहास बारटक्के, चिपळूण. जनमित्र पुरस्कार – राजेंद्रप्रसाद राऊत, ग्रामसेवक, राजापूर. भार्गव घाग, पोलीस जमादार, शिपोशी, ता. लांजा. कलाश्री पुरस्कार – उमाशंकर दाते, आडिवरे, राजापूर. सचिन काळे, रत्नागिरी. आदर्श गृहिणी पुरस्कार – श्रीमती सुनीता सु. चव्हाण, वाटूळ, ता. राजापूर. श्रीमती वैशाली ह. आयरे, रिंगणे, ता. लांजा. सावित्रीबाई फुले पुरस्कार – सिद्धी शिरसेकर, जैतापूर, ता. राजापूर. प्रांजल कोलते, सालपे, ता. लांजा. माऊली पुरस्कार – हभप नंदकुमार वा. चव्हाण, वाटूळ, ता. राजापूर. हभप मनोहर स. रणदिवे, खोरनिनको, ता. लांजा. उद्यमश्री पुरस्कार – नीलेश सुवारे, लांजा. नरेश पांचाळ, रिंगणे, ता. लांजा. संस्था कार्यकर्ता पुरस्कार – गणपत वळंजू, वाटूळ, ता. राजापूर.
यावेळी संघाचे अध्यक्ष सुभाष लाड, संमेलनाचे अध्यक्ष ज्येष्ठ संपादक दिनकर गांगल, भारताचार्य सु ग शेवडे आणि अन्य मान्यवर तसेच साहित्य रसिक उपस्थित होते.