कोकणातील प्रथितयश चित्रकार प्रकाश राजेशिर्के यांच्या कलाकृतींचे जहांगीरमध्ये प्रदर्शन

- ३१ डिसेंबर ते ६ जानेवारीपर्यंत प्रदर्शन सर्वांसाठी खुलं
संगमेश्वर : आंतरराष्ट्रीय ख्यातीचे एक प्रयोगशील चित्रकार – शिल्पकार म्हणून कलाक्षेत्रात परिचित असलेले प्रकाश राजेशिर्के यांच्या कलाकृतींचे प्रदर्शन मुंबई येथील जहांगीर आर्ट गॅलरीमध्ये ३१ डिसेंबर ते ६ जानेवारी २०२५ या कालावधीत संपन्न होत आहे. या प्रदर्शनाला कलारसिकांनी भेट द्यावी, असे आवाहन श्री. राजेशिर्के यांनी केले आहे.
कधी ५० डिग्री तापमान असलेल्या भट्टीत विविध शिल्पांची निर्मिती करणे, तर कधी निसर्गाच्या सानिध्यात जाऊन त्याचे सूक्ष्म अवलोकन करत, विविध माध्यमांच्या सहाय्याने निसर्गाच्या अलौकिक अदांचे रेखाटन करणारे प्रयोगशील, अभ्यासू आणि कला समीक्षक म्हणून ओळखले जाणारे चित्रकार शिल्पकार प्रकाश अर्जुन राजेशिर्के हे कलाक्षेत्रात ‘ पप्पा ‘ म्हणून ओळखले जातात. असंख्य कलाकारांना घडविणारे आणि नवी दृष्टी देणारे प्रकाश राजेशिर्के हे नांव महाराष्ट्राच्या कलाक्षेत्रातील एका विशिष्ट उंचीवरचे आहे. कलाक्षेत्रासाठी स्वतःचे जीवन समर्पित करणारे राजेशिर्के सर कलाक्षेत्राच्या प्रगतीसाठी सतत अस्वस्थ असतात. या अस्वस्थ वृत्तीतूनच त्यांच्या हातून घडणारी कलाकृती ही अद्भुतच असते.
आजवर राजेशिर्के यांची तीन स्वतंत्र कला प्रदर्शने संपन्न झाली आहेत. एकूण दहा समूह प्रदर्शनात त्यांनी भाग घेतला आहे. त्यांच्या कलाकृती आणि लेखनाला आजवर सात पुरस्कार प्राप्त झाले आहेत. राज्य कला संचालनालयाच्या महाराष्ट्र राज्य कला गौरव पुरस्कारासह आजवर विविध २२ पुरस्कारांनी प्रकाश राजेश शिर्के यांचा सन्मान करण्यात आला आहे. जहांगीर आर्ट गॅलरीत भरणारे त्यांचे हे चौथे वैयक्तिक कला प्रदर्शन आहे.
प्रकाश अर्जुन राजेशिर्के यांचे मूळ गाव कुडप . बालपणापासून कलेची आवड, त्यातच शिर्के घराणे अत्यंत शिस्तीचे . बालपणापासूनच शिस्तीत वाढल्यामुळे ही शिस्त पुढे पप्पांच्या जीवनप्रवासाचा एक अविभाज्य भाग बनली . पप्पा सर स्वभावाला जरी उग्र वाटत असले तरी, प्रत्यक्षात ते तसे नाहीत. त्यांच्यातील गोडवा अनुभवायला त्यांच्या सहवासात खूप काळ घालवावा लागतो. पप्पांचा चेहरा काहीसा रागीट, उग्र असा भासला तरी, त्याच्यामागे एक हळवं मन लपलेले आहे . त्यांचा स्वभाव ज्यांनी अगदी जवळून अनुभवता आला त्यांनी पप्पांमधील एक हळवा माणूस देखील अनुभवला आहे . सागरामध्ये उभ्या असलेल्या खडकाप्रमाणे त्यांनी अनेक लाटांचे तडाखे झेलून स्वतःचे अस्तित्व जराही डळमळीत होवू दिलेले नाही. या लाटा कधी हळूवार, तर कधी वादळातील आक्राळविक्राळपणा घेऊन खडकावर धडकल्याने पप्पांकडे अनुभवाची खूप मोठी शिदोरी जमा झाली. लाटांना अथवा वादळांना न डगमगणाऱ्या पप्पांनी सागरा नजीक असणारा दीपस्तंभ बनणे पसंत केले.
विविध माध्यमातील प्रयोगशील व तंत्रशुध्द निर्मिती व त्यावरील कमालीची हुकूमत असलेले राजेशिर्के स्वतःमधील कारागीरीला सृजनाच्या पातळीवर पुन्हा पुन्हा खोदतात. रंगाकार बहुरुप भासले तरी एक लयबध्द रुपभान जागृतपणे जपलेले आहे व त्या एकरुपतेने पुन्हा सृष्टीच्या स्थूल रुपाचे सारे भेद संपून तत्वतः स्वभावच प्रकटतो. एक अभ्यासू कलासमीक्षक व हाडाचे दृश्यकला शिक्षक या त्यांच्या अंगी असलेल्या पैलूंचा विचार केला तर त्यांनी स्वतःच्या कलाकृतींची स्व समीक्षाच केली. म्हणून त्यांचे संपूर्ण काम हे एक कला शैक्षणिक दस्तऐवज ठरते. ज्यांनी ज्यांनी हा अनुभव घेतला आहे ते कुणीही हे मान्य करतील.
कोकणात आढळणा-या जांभ्या दगडात राजेशिर्के यानी शिल्प निर्माण केली. जन्मभूमी आणि कर्मभूमीच्या स्पर्शाने लाभलेली ही धारणा फार मोठी आहे. जांभ्या दगडाच्या नैसर्गिक पोताला साजेसा रुपबंध त्यानी घडविला. हे काम इतकं मूल्यवान आहे की सखोल विचारांचे कला अभ्यासकच त्यांचा कालातीत असा कलात्मक दर्जा जाणू शकतात. त्या कामास योग्य त्या कला व्यासपीठाची गरज आहे, हे निर्विवाद सत्य आहे. अत्यंत मोजक्याच कला संग्रहांकडे त्यांच्या कलाकृती संग्रहात आहेत.
पंचमहाभूतांच्या सान्निध्यातुन निर्माण झालेला निसर्ग हा माझा गुरु. या निसर्गाने मला त्याच्या प्रत्येक घटकांपासून म्हणजे वृक्ष – वेली, फळे – फुले, प्राणी- पक्षी, किटक आणि सरपटणारे प्राणी, नदी-नाले, दगड-धोंडे, समुद्र – आकाश, कातळ – डोंगर आणि द-या, ऊन पाऊस अशा अनेक घटकांनी मला कळत नकळत जगायला – आणि जगवायला शिकविले.
माझी कला साधना म्हणजे आंतरिक मनातील मनन- चिंतन – प्रयोगशीलता यांचा अध्यात्मिक संगम होय. माझ्या सजग जीवनातून निसर्गाचा स्वानुभवाचा साक्षात्कार मला सतत होत असतो. याच साक्षात्कारापासून माझी कला-साधना अनंतपणे सुरु आहे. ती पुढेही सुरुच राहिल. माझे निसर्गावरील प्रेम, माझ्या कलाकृतींशी मनोभावे एकरुप होणाऱ्याला निश्चितपणे समजेल.– प्रकाश अर्जुन राजेशिर्के, चित्रकार शिल्पकार.
त्यांच्या जलरंग माध्यमातील कलाकृती पारंपारिक जलरंग तंत्राला फाटा देणा-या असून, त्यातील सृजनशील मनाचा वर्तमान अनुभव प्रखर आहे. काळया शाईचे रेषाकंन व त्यावर हळुवारपणे पांघरलेले जलरंगांचे पारदर्शक पदर यांचा अनुभव घेताना अशी प्रचिती येते की काळाच्या ओघात झिरझिरीत झालेल्या पुरातन वस्त्राचा पोत व त्यावरील वेलबुट्टीचा, अगम्य लिपीचा अप्रतिम नमुनाच त्यांच्या कोलाज माध्यमातील चित्रांतून पहावयास मिळतो. या प्रदर्शनातील त्यांची रेखाचित्रे म्हणजे रेषेचे सगुण कायारुप ! धातूच्या पत्र्यावर विशिष्ट प्रक्रिया करून साध्या ऑईल पेंटने केलेल्या चित्रकृती आज सुमारे पंचवीस वर्षानंतरही सुस्थितीत आहेत. माध्यमाची सदासर्वकाळ व्यवस्थितपणे टिकून रहाण्याची क्षमता लक्षात घेवून इष्ट तंत्र कौशल्याने कलाकृती घडवणं ही सोपी गोष्ट नाही. त्यातही नवनिर्मितीच्या ध्यानावस्थेतून अंतिमतः आत्मप्रकटीकरणाचाच प्रवास सुरु होतो.