कोकणातील युवा कलाकारांच्या कलाकृती मुंबईत झळकणार !
- प्रभादेवी येथे चित्रांचे प्रदर्शन
- १० ते १८ ऑगस्ट दरम्यान पाहण्याची संधी
संगमेश्वर दि. ७ : सावर्डे येथील सह्याद्री स्कूल ऑफ आर्ट तसेच देवरुख येथील डी कॅड महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या कलाकृतींची मुंबईत होणाऱ्या कला प्रदर्शनासाठी निवड झाली आहे. दि. 10 ते 25 ऑगस्ट 2024 दरम्यान हे प्रदर्शन सुरू राहणार आहे.
सह्याद्री शिक्षण संस्थेच्या वटवृक्षाचा एक भाग म्हणजे कोकणातील अग्रगण्य सह्याद्री स्कूल ऑफ आर्ट सावर्डे यामध्ये विद्यार्थी शिक्षण घेत असताना त्यांची कला ही समाजापुढे येऊन तिला जागतिक प्रसिद्धी मिळावी यासाठी कोकणचे जेष्ठ चित्रकार -शिल्पकार व कलामहाविद्यालयाचे चेरमन प्रा. प्रकाश अर्जुन राजेशिर्के अनेक होतकरू कला विद्यार्थ्यांना सातत्याने प्रोत्साहन देऊन धडपडत असतात. आपली कला ही समाजापुढे मांडताना ते आर्थिक, सामाजिक व कलात्मक दृष्ट्या मजबूत असेल तर ते लोकांना जास्त भावते व या सर्व पातळींवर मार्गदर्शन प्रा. राजेशिर्के हे सातत्याने देत असतात.व या त्यांच्या अमूल्य मार्गदर्शनावर सह्याद्रि स्कूल ऑफ आर्टचे सर्व विद्यार्थी खरे उतरण्याचा पुरेपूर प्रयत्न करत असतात. राजेशिर्के यांनी आपल्या कला महाविद्यालयाबरोबर आपल्या भागातील कला विद्यार्थ्यांना प्रकाश झोतात आणण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे देवरूख येथील डि-कॅड कला महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची निवड देखील या प्रदर्शनात झाली आहे.
यामध्ये सह्याद्री स्कूल ऑफ आर्ट सावर्डे या कलामहाविद्यालयातील यावर्षी अंतिम वर्षात उत्तीर्ण झालेल्या पेंटिंग विभागातील पाच विद्यार्थ्यांची या कला प्रदर्शनासाठी निवड झाली आहे. त्यामध्ये कु. ईशा राजेशिर्के, कु. सायली कदम, कु. मयुरी सावंत, कु. राज वरेकर, कु. करण आदवडे यांच्या २५ चित्रांची निवड झाली आहे. तसेच देवरुख कला महाविद्यालयातील कु. आर्या कामत,कु. प्रियांशु मिठागरी, कु.टेंझीन ओल्डन यांची १३ चित्रे निवड झाली आहेत.या चित्रांतून कोकणातील प्रादेशिक विविधतेने नटलेले सौंदर्य जलरंग, अक्रेलिक,तैलरंग, रंगीत खडू या माध्यमातून चितारण्याचा प्रयत्न केला आहे.
” कोकण रिजन “या नावाने होणाऱ्या या कला प्रदर्शनाचे उद्घाटन दि.१० ऑगस्ट २०२४ या दिवशी होणार आहे. व ते १८ ऑगस्ट २०२४ पर्यंत सर्वांसाठी नित्या आर्टिस्ट सेंटर, प्रभादेवी मुंबई येथे सकाळी ११वा. ते सायं ०७वा. पर्यंत खुले असेल. विद्यार्थी आपल्या या यशाचे श्रेय कलामहाविद्यालयास तसेच कोकणचे जेष्ठ चित्रकार शिल्पकार प्रकाश राजेशिर्के यांना देत आहेत.
सर्व विद्यार्थ्यांना सह्याद्रि शिक्षण संस्थेचे कार्यध्यक्ष व संगमेश्वर -चिपळूण मतदार संघांचे आमदार शेखर निकम, संस्थेचे अध्यक्ष बाबासाहेब भुवड, सेक्रेटरी महेश महाडिक, जेष्ठ चित्रकार शिल्पकार प्रकाश अर्जुन राजेशिर्के , सौ. पूजाताई निकम, स्कूल कमेटी सर्व सदस्य,कलामहाविद्यालयाचे प्राचार्य. माणिक यादव तसेच प्राध्यापकवर्ग यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.