‘कोकण मीडिया’ला मराठी वृत्तपत्र लेखक संघाचा सर्वोत्कृष्ट दिवाळी अंक पुरस्कार

रत्नागिरी : मुंबईच्या मराठी वृत्तपत्र लेखक संघाने आयोजित केलेल्या ४९व्या राज्यस्तरीय दिवाळी अंक स्पर्धेत रत्नागिरी येथील साप्ताहिक कोकण मीडियाच्या दिवाळी अंकाला उत्कृष्ट साहित्यिक अंक म्हणून पुरस्कार मिळाला आहे.
मराठी वृत्तपत्र लेखक संघ-मुंबई, दादर सार्वजनिक वाचनालय आणि मराठी विचारधारा प्रतिष्ठान-गोरेगाव यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या मराठी भाषा गौरव दिनाच्या कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते मुंबईत हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. कोकण मीडियाचे मुंबईतील प्रतिनिधी विजय पुरोहित यांनी हा पुरस्कार स्वीकारला. कोकण मीडियाचा हा नववा दिवाळी अंक कोकणातील ग्रामदैवते या विषयाला वाहिलेला होता. कार्यक्रमाला ज्येष्ठ पत्रकार सचिन परब, कवी एकनाथ आव्हाड, कामगार नेते दिवाकर दळवी, मराठी वृत्तपत्र लेखक संघाचे अध्यक्ष रवींद्र मालुसरे, चितळे उद्योगसमूहाचे राहुल जोगळेकर, दादर सार्वजनिक वाचनालयाचे सेक्रेटरी यतीन कामथे, मराठी विचारधारा प्रतिष्ठानचे विश्वस्त विकास होशिंग आदी मान्यवर उपस्थित होते.
यंदा अमृतमहोत्सवाची सांगता होत असलेल्या मराठी वृत्तपत्र लेखक संघाने आयोजित केलेल्या ४९व्या राज्यस्तरीय दिवाळी अंक स्पर्धेत मनोरंजनकार का. र. मित्र स्मृती सर्वोत्कृष्ट अंक पुरस्कारासह विविध पुरस्कार देऊन उत्कृष्ट दिवाळी अंकांचा सचिन परब यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. त्यात पुढील अंकांचा समावेश आहे. नवलाई डोंबिवलीकर (संपादक-रवींद्र चव्हाण), कोकण मीडिया-रत्नागिरी (संपादक-प्रमोद कोनकर), ठाणे नागरिक-ठाणे (संपादक-सतीशकुमार भावे), मनोकल्प-पुणे (संपादक-अपर्णा चव्हाण), मोडीदर्पण-मुंबई (संपादक-सुभाष लाड), निसर्गोत्सव-कोल्हापूर सकाळ (संपादक निखिल पंडितराव), संस्कार भक्तिधारा, कालनिर्णय, कोकणसाद, शब्दशिवार, सृजनदीप, पुढारी दीपस्तंभ, चांगुलपणाची चळवळ, नवाकाळ, मीडिया वॉच, उद्याचा मराठवाडा, नवभारत, कलासागर, द इनसाइट. या स्पर्धेत मुंबई-पुण्यासह संपूर्ण महाराष्ट्रातून, तसेच, इंदूर, शिकागो, सिंगापूर अशा विविध ठिकाणांहून १७३ अंक सहभागी झाले होते.
या वेळी ‘कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञान मराठी भाषेसाठी किती उपयुक्त’ या विषयावर ३० वर्षे संगणक क्षेत्रात अध्यापन करणारे भानुदास साटम यांचे व्याख्यान झाले. प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना दैनिक पुढारीचे सल्लागार संपादक सचिन परब म्हणाले, की ‘अभिजात मराठी भाषा ज्ञानभाषा व्हावी याचा प्रचार करण्यासाठी मराठी वृत्तपत्र लेखक संघाने संकल्प केला आहे. अभिजाततेबरोबरच ती अधिकाधिक व्यवहारी कशी होईल यासाठी प्रयत्न झाला तरच हे शक्य आहे. याचबरोबर कृत्रिम प्रज्ञा (एआय) व्यवहारात मराठी अधिक उपयोगासाठी आणण्यासाठी त्याप्रमाणे मजकूर संगणकात लिहायला हवा. आज या ठिकाणी भानुदास साटम सरांनी एआय तंत्रज्ञान मराठी भाषेसाठी किती उपयुक्त या विषयावर व्याख्यान दिले. परंतु काही विषय या तंत्रज्ञानाला मांडताच येणार नाहीत. एखादी प्रत्यक्ष घटना घडल्यानंतर प्रत्यक्ष फिल्डवर जाऊन केलेले रिपोर्ताज एआय कसे तयार करणार? संत तुकारामांविषयी जगभरातील जवळजवळ सर्व भाषांमधून लिहिले गेले आहे. त्यामुळे त्यांची ओळख सर्वत्र झाली आहे. आपल्या महाराष्ट्राची संस्कृती आणि मराठी भाषेची ओळख अथवा माहिती जगभर व्हावी असे वाटत असेल, तर त्यासंबंधीचा मजकूर (कंटेंट) ऑनलाइन प्रसिद्ध व्हायला हवा. आज व्यक्त होण्याची अनेक साधने निर्माण झाली आहेत. पूर्वीपासून आजपर्यंत कोणत्याही दैनिकातील संपादकीय पानावरील एक कोपरा व्यक्त होण्यासाठी सर्वसामान्यांसाठी हक्काचा आहे. त्या मंडळींची ही संस्था आहे, या संस्थेत आजपर्यंत अनेक दिग्गज मान्यवर येऊन गेले आहेत. मीसुद्धा स्वतःला भाग्यवान समजतो.’
फुलामुलांत रमणारे लेखक, प्रसिद्ध बालसाहित्यकार आणि साहित्य अकादमी पुरस्कार विजेते लेखक एकनाथ आव्हाड म्हणाले, की ‘पुस्तके माणूस जोडण्याचे काम करतात. म्हणूनच आपण पुस्तकांना आपले मित्र म्हणतो. लेखकांची आणि पुस्तकांची ताकद मोठी असून, दर्जेदार पुस्तकांच्या वाचनामुळे आपल्या व्यक्तिमत्त्वाला आकार मिळतो. पुस्तकांशी मैत्री करा. स्वप्ने बघा. परंतु त्यासोबत एखादी कलाही जोपासा. कलेमुळे जीवनाचा खरा आनंद तुम्हांला मिळेल. वाचनाचा छंद तुम्हाला जीवन कसे जगायचे ते शिकवेल.’
ज्येष्ठ कामगार नेते दिवाकर दळवी यांनी मराठी भाषा, मराठी माणूस आणि सरकारचे मराठी भाषेविषयीचे धोरण याची अभ्यासपूर्ण मांडणी आपल्या भाषणात केली. रवींद्र मालुसरे यांनी अभिजात मराठी भाषा उपक्रमाचे स्वरूप आणि संस्थेच्या कार्याची ओळख सांगणारे प्रास्ताविक केले. उपस्थितांचे स्वागत प्रमुख कार्यवाह प्रशांत घाडीगावकर यांनी, सूत्रसंचालन कार्यवाह नितीन कदम आणि राजन देसाई यांनी, तर आभारप्रदर्शन दिगंबर चव्हाण यांनी केले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी माजी अध्यक्ष विजय ना. कदम, मनोहर साळवी, सुनील कुवरे, कार्याध्यक्ष रमेश सांगळे, कोषाध्यक्ष आत्माराम गायकवाड, आबास आतार यांनी विशेष मेहनत घेतली.