महाराष्ट्ररत्नागिरी अपडेट्सलोकल न्यूजसाहित्य-कला-संस्कृती

गणपतीपुळे येथे उद्या अंगारकी चतुर्थी यात्रोत्सव

  • देवस्थान सभागृहात विशेष बैठकीत अंगारकीचे नियोजन

गणपतीपुळे : रत्नागिरी तालुक्यातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र असलेल्या गणपतीपुळे येथे मंगळवार दिनांक १२ ऑगस्ट रोजी अंगारकी चतुर्थी यात्रोत्सव संपन्न होणार आहे. या पार्श्वभूमीवर नियोजनात्मक विशेष बैठक गणपतीपुळे देवस्थानच्या सभागृहात रत्नागिरीचे तहसीलदार राजाराम म्हात्रे व प्रांताधिकारी जीवन देसाई यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली. यावेळी १२ ऑगस्ट रोजी होणाऱ्या अंगारकी चतुर्थी यात्रोत्सवाचे अतिशय चोख नियोजन करून सर्व यंत्रणांना सतर्क राहण्याच्या सूचना तहसीलदार व प्रांतधिकाऱ्यांनी दिल्या आहेत.

या बैठकीत गणपतीपुळे येथे अंगारकी चतुर्थी यात्रोत्सवाच्या निमित्ताने येणाऱ्या विविध ठिकाणच्या भाविकांना दर्शनाची व अन्य सर्व प्रकारच्या व्यवस्था अतिशय सुरळीतरित्या उपलब्ध होण्याच्या दृष्टीने तहसीलदार व प्रांताधिकारी यांनी गणपतीपुळे ग्रामपंचायत ,
देवस्थान समिती, पोलीस यंत्रणा, महावितरण, आरोग्य विभाग, आरटीओ, एसटी महामंडळ, अग्निशामक दल, आपत्ती व्यवस्थापन विभाग, महसूल विभाग व अन्य सर्व संबंधित यंत्रणांना सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. तसेच अंगारकीच्या पार्श्वभूमीवर सर्व यंत्रणांनी आपापल्या कामांची दखल घेऊन सर्व कामे योग्य प्रकारे पूर्ण करावीत .तसेच येणाऱ्या भाविकांना कुठल्याही प्रकारची गैरसोय उद्भवणार नाही, या दृष्टीने चोख नियोजन करावे अशा स्वरूपाच्या सूचना देण्यात आल्या.

या अंगारकी चतुर्थी उत्सवाच्या निमित्ताने स्वयंभू श्रींचे मंदिर पहाटे साडेतीन वाजता दर्शनासाठी खुले होणार असून प्रारंभी गणपतीपुळे मंदिराचे मुख्य पुजारी अभिजीत विनायक घनवटकर यांच्या हस्ते श्रींची पूजा अर्चा, मंत्र पुष्प व आरती झाल्यानंतर भाविकांना मंदिरात दर्शनासाठी सोडण्यात येणार आहे. त्यानंतर पहाटे साडेतीन ते रात्री साडेदहा अशा एकूण १८ तासांच्या कालावधीत भाविकांना दर्शनाची सोय उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या निमित्ताने यंदा ५० ते ६० हजार भाविक श्रींच्या दर्शनासाठी येतील, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. तसेच यंदा अंगारकीचा योग पवित्र श्रावण महिन्यात जुळून आल्याने घाटमाथ्यासह महाराष्ट्रातील अन्य ठिकाणाहून मोठी गर्दी होईल असा अंदाज व्यक्त केला जात आहे. गतवर्षी च्या अंगारकीला २५ हजारांपर्यंत भाविक येतील असा अंदाज व्यक्त केला करण्यात आला होता. मात्र त्यापेक्षा ५० हजारांहून अधिक भाविक आल्याची माहिती या बैठकीत देण्यात आली.त्यामुळे यंदाच्या अंगारकीला भाविकांच्या गर्दीत मोठी वाढ होणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

या पार्श्वभूमीवर संपूर्ण मंदिर आणि गणपतीपुळे परिसरात परिसरात भाविकांच्या गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी अत्यंत नेटके नियोजन करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत .तसेच या निमित्ताने भाविकांच्या वाहनांची पार्किंग व्यवस्था करण्यासाठी गणपतीपुळे येथील सागर दर्शन पार्किंग, महालक्ष्मी हॉल आणि गणपतीपुळे खारभूमी मैदान या भागात पार्किंगची व्यवस्था करण्यात येणार आहे. या अंगारकीच्या पार्श्वभूमीवर गणपतीपुळे परिसरातील सर्व खड्डे बुजवण्याच्या सूचना संबंधित बांधकाम विभागाला देण्यात आल्या आहेत तसेच खवळलेल्या समुद्राची सध्याची धोक्याची स्थिती लक्षात घेऊन येणाऱ्या भाविकांना सूचना मिळाव्यात यासाठी गणपतीपुळे ग्रामपंचायत आणि सर्व यंत्रणांच्या वतीने परिसरात माहिती फलक लावण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच समुद्राची असलेली धोक्याची स्थिती लक्षात घेऊन समुद्रकिनारी विशेष गस्त घालण्यासाठी गणपतीपुळे ग्रामपंचायतीचे जीवरक्षक, देवस्थानचे सुरक्षारक्षक व अन्य यंत्रणा सज्ज ठेवाव्यात अशा सूचना देण्यात आल्या आहेत .तसेच स्थानिक गणपतीपुळे ग्रामपंचायतीने परिसरातील वीजपुरवठा , पाणी व्यवस्था, पार्किंग व्यवस्था व अन्य सर्व प्रकारच्या सोयी सुविधा भाविकांना तत्पर मिळण्याच्या दृष्टीने कटाक्षाने लक्ष घालावे अशा सूचना देण्यात आल्या आहेत.

या विशेष नियोजनात्मक बैठकीला रत्नागिरीचे तहसीलदार राजाराम म्हात्रे, प्रांताधिकारी जीवन देसाई यांचेसमवेत संस्थान श्री देव गणपतीपुळे चे सरपंच डॉ. श्रीराम केळकर ,पंच अमित मेहेंदळे, विद्याधर शेंडे , गणपतीपुळेच्या सरपंच कल्पना पक्ये, जयगड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक कुलदीप पाटील आदींसह गणपतीपुळे मंदिराचे मुख्य पुजारी अभिजीत विनायक घनवटकर, ग्रामपंचायत सदस्य राज देवरुखकर, ग्रामसेवक प्रविण चौधरी, गणपतीपुळे पोलीस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक संदीप साळवी, राहुल घोरपडे,भागवत, मालगुंड तलाठी कार्यालयाचे मंडल अधिकारी अरुण जाधव,तलाठी वीर,कोतवाल सुशील दुर्गवळी ,मालगुंड आरोग्य विभागाचे नागवेकर आदी मान्यवर आणि विविध खात्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

बैठकीच्या प्रारंभी उपस्थितांचे स्वागत गणपतीपुळे देवस्थानचे मुख्य लिपिक महेश भिडे यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रांतअधिकारी जीवन देसाई यांनी केले.

Team RatnagiriLive

कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button