गुहागरमधील तवसाळ तांबडवाडी येथे परंपरा जपत नागपंचमी साजरी!

गुहागर : गुहागर तालुक्यातील तवसाळ तांबडवाडीत दि. २९ जुलै २०२५ रोजी महिलांकडून अनेक वर्षांपासूनची परंपरा जपत एकत्र येऊन नागपंचमी साजरी करण्यात आली. कोकणात परंपरेचे सातत्य राखण्यासाठी निसर्गाच्या सान्निध्यात वारुळे (घोमाडे) तयार करून त्याचे शुद्धीकरण केले जाते. त्यानंतर
नागदेवतेची केली जाते मनोभावे पूजा
या दिवशी नागदेवतेला दूध, लाह्या, फुले अर्पण करण्याची प्रथा आहे. कोकणात विशेषतः शेताच्या बांधावर उगवलेल्या घोमेटीला वेलाला मान दिला जातो. तेडसा, सोनवली, तीळाची फुले तसेच निसर्गात फुललेली विविध फुले वापरून पूजा केली जाते. अख्खा भात, लाह्या, साखर किंवा गूळ, काळे पांढरे तीळ वापरून नागदेवतेला नैवेद्य दाखवला जातो.
महिला वर्ग या पूजेत सामूहिक सहभाग घेतो. या दिवशी पारंपरिक पद्धतीने नवीन वस्त्रे परिधान करून सर्व महिला एकत्र येतात. पानांमध्ये पातोळे बनवून प्रसाद म्हणून वितरित केले जातात. याही वेळी नागपंचमीचा उत्सव धार्मिक श्रद्धा आणि गोडवा जपत पारंपरिक उत्साहात साजरा करण्यात आला.
कोकणात श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षातील पंचमीला नागपंचमी साजरी करण्याची प्रथा आहे आणि या सणाला विशेष महत्त्व दिले जाते.