महाराष्ट्रलोकल न्यूज

ओबीसींच्या आरक्षणात मराठ्यांची घुसखोरी आगरी कोळी कराडी समाज सहन करणार नाही :  राजाराम पाटील

उरण दि.१३  (विठ्ठल ममताबादे) : राज्यात मराठा विरुद्ध ओबीसी आरक्षण वाद पेटला आहे. मराठा समाजाला कुणबी म्हणून प्रमाणपत्र मिळणार आहेत. शासन निर्णया प्रमाणे मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देऊन ओबीसी प्रवर्गात समाविष्ट केला जाणार आहे. त्यामूळे ओबीसी प्रवर्गात असलेल्या विविध जाती उपजाती यांच्यावर खूप मोठा परिणाम होणार आहे. मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गात प्रवेश दिल्याने ओबीसी प्रवर्गातील नागरिक यांना शिक्षण, नोकरी उद्योगधंदे आदी क्षेत्रात मिळणारे आरक्षण संपुष्टात येईल. पर्यायाने ओबीसी समाजाचे सर्वच क्षेत्रात पीछेहाट होईल. ओबीसी समाज विकासापासून लांब राहिल. मराठ्यांना ओबीसीमध्ये आरक्षण दिल्याने ओबीसी समाजाचे अस्तित्व धोक्यात आले आहे.ओबीसी समाजाला न्याय मिळावा,ओबीसी समाजाचे अस्तित्व टीकावे,ओबीसी समाजात न्याय हवका संबधी जनजागृती व्हावी, या अनुषंगाने जसखार ग्रामपंचायतचे सदस्य हेमंत ठाकूर यांनी दिनांक १२/९/२०२५ रोजी संध्याकाळी ६:३० वाजता श्री रत्नेश्वरी मंदिर, जसखार, तालुका उरण, जिल्हा रायगड येथे एका महत्वाच्या बैठकीचे आयोजन केले होते.

या बैठकीला ओबीसी चळवळीचे नेते,अभ्यासू व्यक्तिमत्व राजाराम पाटील यांनी मार्गदर्शन केले. मराठा समाजाला ओबीसी आरक्षण देऊन शासन ओबीसी समाजावर अन्याय करत आहे.मराठ्यांना ओबीसीमधून आरक्षण दिल्याने ओबीसीचे अस्तित्व धोक्यात आले आहे. त्यामु‌ळे ओबीसी समाजातील सर्वच नागरिकांनी एकत्र येऊन झालेल्या अन्यायाच्या निषेधार्थ आवाज उठविला पाहिजे.आपल्या न्याय हक्कासाठी जागरूक राहिले पाहिजे असे राजाराम पाटील यांनी बैठकीत उपस्थितांना मार्गदर्शन केले.

ओबीसी स्त्रिया पुरुष यांच्या दृष्टीने महत्वाच्या असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्था ग्राम पंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद,महानगर पालिका यात कुणबी दाखले घेऊन मराठे घुसतील आणि आगरी कोळी कराडी यांचे राजकीय आरक्षण संपेल. घरे गावठाणे तोडली जातील. त्यांचा सिडको नगरविकास खाते एस आर ए करतील.त्यांना झोपडपट्ट्या घोषित करतील. त्यामुळे खूप मोठा अन्याय ओबीसीवर होईल.असे राजाराम पाटील यांनी सांगितले.

यावेळी ओबीसी प्रवर्गातील कोणत्याही जाती, उपजाती वर अन्याय होऊ देणार नाही. कोणी तसे केल्यास येथील ओबीसी समाज ते अन्याय सहन करणार नाही. असा आक्रमक इशारा राजाराम पाटील यांनी प्रशासनाला दिला आहे.उरण पनवेल तालुक्यात तसेच रायगड जिल्ह्यात बहुसंख्येने आगरी, कोळी,कराडी समाज वास्तव्यास आहे हा समाज ओबीसी प्रवर्गात मोडतो.या समाजात जनजागृती करण्याच्या उद्देशाने श्री रत्नेश्वरी मंदिर जसखार, तालुका उरण, जिल्हा रायगड येथे महत्वाच्या विषयावर बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. उरण तालुक्यात झालेली ही बैठक कोकण विभागातील ओबीसींचे हे पहिलीच बैठक आहे. ओबीसींना न्याय मिळवून देण्यासाठी संपूर्ण कोकणात पहिल्यांदा उरण मध्ये अशा मिटिंगचे आयोजन केले गेले. या बैठकीस जसखार ग्रामपंचायतच्या सरपंच काशीबाई ठाकूर, माजी उपसरपंच प्रणाली म्हात्रे, माजी सरपंच रमाकांत म्हात्रे, कामगार नेते सुरेश म्हात्रे, ग्रामपंचायत सदस्य आशुतोष म्हात्रे, ग्रामसुधारणा मंडळ जसखारचे अध्यक्ष मेघनाथ ठाकूर, ग्रामसुधारणा मंडळाचे माजी अध्यक्ष सुनिल ठाकूर, ग्रामसुधारणा मंडळाचे सेक्रेटरी सचिन ठाकूर, ग्रामसुधारणा मंडळ माजी अध्यक्ष उमेश पारवे, ग्रामस्थ – सुभाष तांडेल, सूर्यकांत ठाकूर, गोरख घरत, संतोष पाटील, जगदीश घरत, अमोल तांडेल, केतन तांडेल, पंढरीनाथ म्हात्रे, वैष्णव ठाकूर, निलेश तांडेल, जगदीश ठाकूर, गणेश ठाकूर आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी विविध मान्यवरांनीही आपापली मनोगते व्यक्त करून उपस्थितांना मार्गदर्शन केले.सर्वांनी एकत्र येऊन ओबीसींच्या न्याय्य हक्कासाठी लढण्याचा निर्धार केला.

Team RatnagiriLive

कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button