गोव्यात चित्पावनी बोली संमेलनाचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते १८ जानेवारीला उद्घाटन
पुणे : चित्पावनी बोली भाषकांचे पहिले संमेलन येत्या १८ जानेवारीला गोव्यातील सांखळी येथे होणार आहे. चित्पावनी भाषा संवर्धन संघाच्या वतीने आयोजित या संमेलनासाठी प्रमुख पाहुणे म्हणून गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत उपस्थित राहणार आहेत. संमेलनाच्या अध्यक्षस्थानी ठाणे जनता सहकारी बँकेचे अध्यक्ष शरद गांगल असतील. पुण्यातील भांडारकर प्राच्यविद्या संस्थेतील प्रा. डॉ. प्रदीप आपटे प्रमुख वक्ते असतील.
अशा प्रकारे भरविण्यात येणारे चित्पावनी या बोली भाषेचे हे पहिलेच संमेलन आहे. सांखळीतील कुळण येथील योगेश्वरी मंदिरात सकाळी नऊ ते सहा वेळेत हे संमेलन होणार आहे. त्यामध्ये साहित्यिक चर्चा, भाषा संवर्धनाविषयी चर्चा, चित्पावनीतील साहित्य, नाट्य, भजने यांचेही सादरीकरण करण्यात येणार आहे.
चित्पावनी ही चित्पावन ब्राह्मण या समुदायाची बोली असून, ती महाराष्ट्रातून सुमारे साठ-सत्तर वर्षांपूर्वीच लोप पावली आहे. सध्या ही बोली केवळ गोव्याचा काही भाग, कर्नाटकातील दक्षिण कन्नड जिल्हा, मंगळूर परिसर आणि तुरळक प्रमाणात केरळमधील कासारगोड येथे बोलली जाते. ती बोलणाऱ्यांची संख्याही अत्यंत मर्यादित आहे. त्यामुळे तिचे जतन आणि संवर्धन होणे आवश्यक आहे, यासाठी प्रयत्न सुरू आहेत. त्याच प्रयत्नांचा भाग म्हणून गोव्यातील डिचोली येथे चित्पावनी भाषा संवर्धन संघाची स्थापना करण्यात आली आहे.
या संस्थेतर्फे चित्पावनी संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यानिमित्ताने चित्पावनी भाषकांचे एकत्रीकरण व्हावे, असा हेतू आहे. संमेलनाला गोव्याबरोबरच महाराष्ट्र आणि कर्नाटकातूनही चित्पावनी भाषक येणार आहेत, अशी माहिती अशी माहिती चित्पावन ब्राह्मण संघ, गोमंतकचे अध्यक्ष दीपक मराठे आणि चित्पावनी भाषा संवर्धन संघाचे स्वागताध्यक्ष सुबोध फडके आणि कार्यवाह विनीत गाडगीळ यांनी दिली.





