ग्रामीण, कृषी व सहकार मराठी साहित्य संमेलन २०२६चे १४–१५ फेब्रुवारीला आयोजन

- शेती–ग्रामीण जीवन–सहकाराचा संगम
- कोकणात प्रथमच प्रयोग
- कृषिभूषण डॉ. तानाजीराव चोरगे शिक्षण व संशोधन संस्था, मांडकी पालवण येथे आयोजन
रत्नागिरी : महाराष्ट्राच्या सांस्कृतिक, सामाजिक आणि आर्थिक जडणघडणीत ग्रामीण जीवन, शेती आणि सहकार यांचे योगदान अमूल्य राहिले आहे. या तिन्ही क्षेत्रांचे साहित्यिक, वैचारिक आणि अनुभवाधिष्ठित दर्शन घडवणारे ग्रामीण, कृषी व सहकार मराठी साहित्य संमेलन २०२६ दिनांक १४ व १५ फेब्रुवारी २०२६ रोजी मांडकी पालवण, ता. चिपळूण येथील कृषिभूषण डॉ. तानाजीराव चोरगे शिक्षण व संशोधन संस्था या संकुलात भरणार आहे अशी माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली.
महाराष्ट्राला शेती व ग्रामीण जीवनाची समृद्ध परंपरा लाभली आहे. संत साहित्यापासून ते आधुनिक ग्रामीण कादंबरी, कविता, कथा, नाटक, पोवाडे, ओव्या, कोळीगीते, शेतकरीगीते अशा असंख्य साहित्यप्रकारांनी मराठी भाषेला समृद्ध केले आहे. ग्रामीण जीवनाचे विविध पैलू साहित्याच्या माध्यमातून सामान्य माणसापर्यंत पोहोचवण्याचे मोठे कार्य अनेक साहित्यिकांनी केले आहे. कृषी हा केवळ ग्रामीण जीवनाचाच नव्हे तर महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेचा आत्मा आहे. आधुनिक काळात कृषी तंत्रज्ञान, संशोधन, शेतीपूरक उद्योग, शाश्वत शेती यांवर आधारित विपुल साहित्य निर्माण झाले असून त्याचा थेट लाभ शेतकऱ्यांना होत आहे. मात्र, आजही शेतीसमोरील प्रश्न, संकटे आणि आव्हाने कायम आहेत; त्यावर विचारमंथन होणे गरजेचे आहे.
सहकार हा कृषीचा अविभाज्य घटक आहे. ‘विना सहकार नाही उद्धार’ या तत्त्वानुसार सहकारी बँका, पतसंस्था, साखर कारखाने, दुग्ध संघ, विविध कार्यकारी सहकारी संस्था यांमुळे शेतकरी आणि सामान्य नागरिकांचे जीवनमान उंचावले आहे. सहकार चळवळीचे महत्त्व, त्यातील मूल्ये आणि उत्तम व्यवस्थापन याविषयी लिहिलेले साहित्य समाजासाठी दिशादर्शक ठरले आहे. ग्रामीण, कृषी आणि सहकार या तिन्ही क्षेत्रांतील साहित्य एकत्रितपणे मांडणारे हे संमेलन राज्यात प्रथमच आयोजित होत असून, ही एक अभिनव आणि वैशिष्ट्यपूर्ण संकल्पना ठरणार आहे.
या संमेलनासाठी ज्येष्ठ साहित्यिक व कृषिभूषण डॉ. तानाजीराव चोरगे यांची एकमताने संमेलनाध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली आहे. डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संजय जी. भावे यांनी स्वागताध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारली आहे. संमेलनाचे प्रमुख कार्यवाह म्हणून डॉ. निखिल चोरगे काम पाहणार आहेत.
या साहित्य संमेलनात महाराष्ट्रासह राज्याबाहेरील नामवंत ग्रामीण, कृषी व सहकार क्षेत्रातील लेखक, साहित्यिक, संशोधक, प्रगतशील शेतकरी, सहकारातील कार्यकर्ते आणि कृषी तज्ज्ञ सहभागी होणार आहेत. हजारो शेतकरी, साहित्यप्रेमी आणि वाचक या संमेलनाला उपस्थित राहणार असून, पुस्तक प्रदर्शन, चर्चासत्रे, परिसंवाद अशा विविध उपक्रमांनी हे संमेलन परिपूर्ण होणार आहे. संमेलनाच्या उद्घाटनासाठी माजी केंद्रीय कृषी मंत्री खा. शरदचंद्रजी पवार, उपमुख्यमंत्री मा. ना. एकनाथजी शिंदे, उद्योग व मराठी भाषा मंत्री, पालकमंत्री मा. ना. उदयजी सामंत यांची उपस्थिती अपेक्षित आहे. समारोपासाठी मुख्यमंत्री मा. ना. देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री मा. ना. अजितदादा पवार उपस्थित राहणार आहेत.
अखिल भारतीय मराठी साहित्य व संस्कृती महामंडळाचे अध्यक्ष व महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, ज्येष्ठ साहित्यिक मा. सदानंद मोरे यांच्यासह अनेक मान्यवर साहित्यिक या संमेलनाला उपस्थित राहणार आहेत.
संमेलनाध्यक्ष डॉ. तानाजीराव चोरगे हे कृषी, ग्रामीण आणि सहकार या तिन्ही क्षेत्रांत कार्यरत असलेले बहुआयामी व्यक्तिमत्त्व आहे. नारळ, आंबा, काजू, कोकम, फणस यांसारख्या हजारो झाडांच्या बागा, डेअरी, पोल्ट्री, बदक पालन, खेकडा पालन, कृषी पर्यटन, गांडूळ खत निर्मिती यांसारखे शेतीपूरक उद्योग त्यांनी यशस्वीपणे उभारले आहेत. त्यांनी कृषी व शेतीपूरक व्यवसायावर अनेक पुस्तके लिहिली असून, ते एम.एस्सी. (कृषी), पीएच.डी., डी.एस्सी. आहेत. ग्रामीण जीवन स्वतः अनुभवले असल्याने त्यांच्या लेखनात अस्सल ग्रामीण जाणिवा दिसून येतात. जवळपास पन्नास पुस्तकांमधून त्यांनी कादंबरी, कथासंग्रह, नाटक, एकांकिका यांद्वारे वाचकांना समृद्ध केले आहे.
सहकार क्षेत्रातही त्यांनी उल्लेखनीय कार्य केले असून, रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे चेअरमन म्हणून बुडालेल्या बँकेला उत्कृष्ट बँकांच्या यादीत नेले आहे. सलग चौदा वर्षे बँकेचा एनपीए शून्य टक्के ठेवण्याची कामगिरी त्यांनी केली आहे. सहकार निष्ठ व सहकार भूषण असे शासन पुरस्कार बँकेला मिळाले आहेत. बँक व्यवस्थापन आणि रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया विषयक त्यांनी लिहिलेल्या पुस्तकांना महाराष्ट्र साहित्य परिषदेचा गौरव लाभला आहे.
अशा बहुआयामी व्यक्तिमत्त्वाच्या शैक्षणिक संकुलात हे साहित्य संमेलन व्हावे, अशी अपेक्षा उद्योग व मराठी भाषा मंत्री मा. ना. उदयजी सामंत यांनी व्यक्त केली होती. त्याला मान देत हे संमेलन डॉ. तानाजीराव चोरगे शिक्षण व संशोधन संस्थेच्या संकुलात आयोजित करण्यात येत आहे.
संमेलनाच्या आयोजनासाठी श्री प्रकाशराव देशपांडे (अध्यक्ष), श्री बाबाजीराव जाधव, श्री अरुण इंगवले, श्री दीपक पटवर्धन, श्री जयवंतराव जालगांवकर, श्री गजानन पाटील, श्री संदीप राजपूरे (उपाध्यक्ष), डॉ. निखिल चोरगे (प्रमुख कार्यवाह), श्री अजय चव्हाण (कोषाध्यक्ष), सह कार्यवाह- श्री वसंत सावंत, श्री उदय वेल्हाळ, श्री प्रफुल्ल सुर्वे आणि सदस्य- श्री राष्ट्रपाल सावंत, श्री राजेंद्र आरेकर, श्री संतोष गोनबरे, श्री सुभाष लाड, श्री धिरज वाटेकर यांच्यासह संयोजन समिती कार्यरत आहे.
ग्रामीण, कृषी आणि सहकार या तीनही क्षेत्रांना साहित्याच्या माध्यमातून एकत्र आणणारे हे संमेलन मराठी साहित्याच्या इतिहासात एक महत्त्वपूर्ण मैलाचा दगड ठरणार असून, समाजमनावर दीर्घकालीन प्रभाव टाकेल, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला आहे.
चिपळूण येथे झालेल्या पत्रकार परिषदेला संमेलन संयोजन समिती अध्यक्ष प्रकाश देशपांडे, उपाध्यक्ष अरुण इंगवले, कोषाध्यक्ष अजय चव्हाण, सदस्य धीरज वाटेकर, संतोष गोणबरे उपस्थित होते.





