चिपळूणमध्ये रामभाऊ साठे वस्तू संग्रहालयाचे उद्घाटन

चिपळूण शहराच्या विकासाला निधी कमी पडू देणार नाही : पालकमंत्री डाॕ. उदय सामंत
रत्नागिरी, दि. ११ : लोकमान्य टिळक स्मारक मंदिरातील रामभाऊ साठे हे वस्तूसंग्रहालय रत्नागिरी जिल्ह्याचा अतिशय महत्त्वाचा ठेवा आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या माध्यमातून या वस्तूसंग्रहालयासाठी ५० लाख रुपयांचा निधी उपलब्ध झाला आहे. चिपळूणच्या विकासाला निधी कमी पडू देणार नाही, अशी ग्वाही पालकमंत्री डाॕ उदय सामंत यांनी दिली.
चिपळूणमधील लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिरच्या रामभाऊ साठे वस्तू संग्रहालयाचे उद्घाटन पालकमंत्री डाॕ सामंत यांच्या हस्ते झाले. यानंतर झालेल्या इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्रातील कार्यक्रमात ते बोलत होते.
पालकमंत्री डाॕ सामंत म्हणाले, २०२१ मध्ये या शहरात आलेला महापूर मी स्वतः पाहिला आहे. या महापुरामध्ये लोकमान्य टिळक स्मारक वाचनालयाच्या वस्तू संग्रहालयाचे पूर्णतः नुकसान झाले. त्याचवेळी तत्कालीन नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी रत्नागिरी शहरासाठी दिलेल्या साडेचार कोटी निधीतील ५० लाख रुपयांचा निधी या वस्तू संग्रहालयाच्या उभारणीसाठी द्यावा, अशी सूचना त्यांनी केली होती. आजकाल जे मदत करतात, ते पडद्यामागे राहतात. उपमुख्यमंत्री श्री. शिंदेसाहेबांनी केलेली ही मदत आपण सर्वांनी लक्षात ठेवली. हाच खरा जिल्ह्याचा संस्कार आहे. त्यांच्यामुळेच आज लोकमान्य टिळक स्मारक वाचनालयाचे हे वस्तू संग्रहालय नव्याने उभे राहिले आहे.
हे वस्तूसंग्रहालय 36 वर्षांपूर्वी चिपळूण येथे उभारण्यात माजी आमदार रमेशभाई कदम यांचे योगदान सर्वात मोठे आहे.
चिपळूण नगर परिषदेला १५० वर्षे पूर्ण होताहेत. या शहराला साजेशी पालिकेची भव्य इमारत उभी करण्याचा आज संकल्प करीत आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून जेवढे पैसे या इमारतीसाठी लागतील, तितका निधी पोहोच करण्याची जबाबदारी मी नक्की पार पाडेन, असेही पालकमंत्री डाॕ सामंत यांनी सांगितले.
वाचनालयाचे कार्याध्यक्ष धनंजय चितळे यांनी प्रास्तविक केले. माजी आमदार रमेशभाई कदम यांना वाचनालयाचे सन्माननीय सदस्य म्हणून या वेळी गौरविण्यात आले. या सन्मानपत्राचे वाचन मनीषा दामले यांनी केले.
कार्यक्रमाला आमदार शेखर निकम, ज्येष्ठ साहित्यिक, इतिहासाचे अभ्यासक प्रकाश देशपांडे, प्रांताधिकारी आकाश लिगाडे, मुख्याधिकारी विशाल भोसले, वाचनालयाचे अध्यक्ष डॉ. यतीन जाधव, उपविभागीय पोलीस अधिकारी राजेंद्रकुमार राजमाने, संध्या साठे-जोशी धनंजय चितळे, डॉ.श्रीधर ठाकूर संस्थेचे पदाधिकारी, सदस्य व नागरिक उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अंजली बर्वे यांनी केले.